इस्लामाबाद :
पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि सैन्याने मिळून भारताच्या विरोधात ‘डोजियर’ तयार केला आहे. या डोजियरमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारताची प्रतिक्रिया आणि दुसऱ्या घटनांचा उल्लेख करत भारताला ‘खलनायक’ ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्याचा हा डोजियर समोर येताच त्याची नाचक्की झाली. या डोजियरमधील चुका पाहून त्याची विश्वसनीयताच संपुष्टात आली आहे. पाकिस्तानचा हा डोजियर कमकुवत पुरावे, चुकीचे स्पेलिंग आणि दुष्प्रचाराने युक्त आहे. डोजियरमध्ये पहलगाम हल्ल्याचा कट भारतानेच रचल्याचा कांगावा करण्यात आला आहे.
डोजियरमध्ये भारतावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत, परंतु पुरावे देण्यात आलेले नाहीत. या डोजियरमध्ये छायाचित्र नाही, तसेच उपग्रहीय छायाचित्र किंवा त्रयस्थ पक्षाची साक्ष नमूद नाही. पुराव्याच्या नावाखाली यात आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांच्या अहवालाचा उल्लेख आहे. या अहवालात त्याचाही कुठलाही स्क्रीनशॉट किंवा लिंक देण्यात आलेला नाही. अशास्थितीत गंभीर मुद्द्यावरील हा दस्तऐवज बालिश आणि हास्यास्पद असल्याचे आंतरराष्ट्रीय तज्ञांनी म्हटले आहे.









