इमाम उल हक, रिझवान यांची अर्धशतके : सामनावीर हॅरिस रौफचे 4 तर नसीम शाहचे 3 बळी
वृत्तसंस्था/ लाहोर
आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोरमधील पहिल्या सामन्यात पाकने बांगलादेशवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळविला. सामनावीर हॅरिस रौफ व नसीम शाह यांची भेदक गोलंदाजी आणि इमाम उल हक व मोहम्मद रिझवान यांची अर्धशतके यांच्या बळावर पाकने 40 व्या षटकातच विजय साजरा केला.
नाणेफेक जिंकत बांगलादेशने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण त्यांचा डाव 38.4 षटकांत 193 धावांवर आटोपला. त्यानंतर हे माफक आव्हान पाकने 39.3 षटकांत 3 बाद 194 धावा जमविल्या. पाकच्या डावात इमाम उल हकने 84 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 78, रिझवानने 79 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह नाबाद 63, बाबर आझमने 22 चेंडूत 17, आगा सलमानने नाबाद 12 धावा केल्या. बांगलादेशच्या तस्किन अहमद, शोरिफुल इस्लाम, मेहदी हसन मिराझ यांनी एकेक बळी मिळविले. पाकला या विजयाचे 2 गुण मिळाले. आता शनिवारी लंका व बांगलादेश यांच्यात सुपर 4 मधील दुसरा सामना होणार आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशच्या संघाची खराब सुरुवात झाली. मुशफिकुर रहीम आणि शकीब अल हसन यांच्याशिवाय बांगलादेशच्या इतर खेळाडूंनी सपशेल निराशा केली. बांगलादेशच्या संघाने 47 धावात 4 विकेट्स गमावले. सलामीवीर मोहम्मद नईमने 20 धावा केल्या तर मेहदी हसन मिराजला भोपळाही फोडता आला नाही. लिटॉन दास 16 तर तौहिद हृदोय 2 धावांवर बाद झाला. यानंतर मुशफिकुर रहीम आणि शकिब अल हसन यांच्यात पाचव्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी झाली. शकीबने 57 चेंडूत 7 चौकारासह 53 तर मुशफिकुरने 87 चेंडूत 5 चौकारासह 64 धावा केल्या. मात्र, शकीब अल हसन बाद झाल्यानंतर बांगलादेश डाव पत्त्यासारखा कोसळला. शकीब अल हसननंतर मुशफिकुर रहीमही बाद झाला. यानंतर खालच्या फळीतील फलंदाजाला माघारी धाडण्यासाठी पाकिस्तानच्या गोलंदाजांना फारशी अडचण झाली नाही. पाकतर्फे वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. याशिवाय, नसीमने 3 बळी मिळविले.

हॅरिस रौफ जलद 50 बळी घेणारा पाकचा तिसरा गोलंदाज
पाकचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफने 19 धावांत 4 बळी घेत अनोख्या विक्रमाची नोंद केली. पाकसाठी सर्वात जलद 50 बळी घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे. रौफचा हा 27 वा सामना असून यामध्ये आपल्या 50 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी पाकिस्तानचा माजी दिग्गज वकार युनूसनेही 27 वनडे सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता. माजी दिग्गज सकलेन मुश्ताकचा विक्रम मात्र रौफकडून मोडीत निघाला. मुश्ताकने 28 वनडे सामन्यात 50 विकेट्स घेतल्या होत्या. पाककडून सर्वात कमी सामन्यांमध्ये 50 वनडे विकेट्सचा विक्रम हसन अलीच्या नावावर आहे. त्याने अवघ्या 24 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली होती. यादीत दुसरा क्रमांक शाहीन शाह आफ्रिदीचा आहे. त्याने 25 वनडे सामन्यांमध्ये 50 विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 38.4 षटकांत सर्वबाद 193 (मोहम्मद नईम 20, शकीब हसन 53, मुशफिकुर 64, शमीम हुसेन 16, हॅरिस रौफ 19 धावांत 4 बळी, नसीम शाह 34 धावांत 3 बळी). पाक 39.3 षटकांत 3 बाद 194 : इमाम उल हक 78, रिझवान नाबाद 63, फखर झमान 20, बाबर आझम 17, सलमान नाबाद 12, शोरिफुल 1-24, तस्किन 1-32.









