बांगलादेशचे आव्हान संपुष्टात, सामनावीर फखर झमान, शफीकची अर्धशतके
वृत्तसंस्था/ कोलकाता
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथील इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात पाकने भेदक गोलंदाजी आणि अब्दुल्ला शफीक व सामनावीर फखर झमान यांच्या अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशवर 7 गड्यांनी दणदणीत विजय मिळवित आगेकूच करण्याच्या आशा जिवंत ठेवल्या तर पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पाकच्या वेगवान गोलंदाजांसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशचा डाव 204 धावात आटोपला. मेहमुदुल्लाहने अर्धशतक तर लिटन दास व कर्णधार शकीब अल हसन यांनी उपयुक्त योगदान दिले. पाकचा 23 वर्षीय वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले. तो पाकतर्फे वनडे क्रिकेटमध्ये जलद 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आपल्या 51 व्या सामन्यात हा पराक्रम केला आहे. यापूर्वी सकलेन मुस्ताकच्या नावावर हा विक्रम नोंदविला गेला होता. त्यानंतर पाकने विजयाचे लक्ष्य 32.3 षटकांत 3 बाद 205 धावा जमवित सहजतेने गाठले. फखर झमानने 74 चेंडूत 3 चौकार, 7 षटकारांसह 81 धावा फटकावल्या तर शफीकने 69 चेंडूत 9 चौकार, 2 षटकारांसह 68 धावा काढल्या. या दोघांनी 128 धावांची भक्कम सलामी देत विजयाचा पाया रचला होता. बाबर आझम 9 धावा काढून बाद झाल्यानंतर रिझवान (21 चेंडूत नाबाद 26) व इफ्तिखार अहमद (15 चेंडूत नाबाद 17) यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझने 60 धावा देत 3 बळी मिळविले.
आफ्रिदी, वासिम ज्युनियरचा भेदक मारा
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर चेंडू अधिक उसळत असल्याने तसेच स्वींग गोलंदाजीला ही खेळपट्टी अनुकूल असल्याने त्याचा पुरेपूर लाभ पाकच्या वेगवान गोलंदाजांनी घेतला. शाहीन शहा आफ्रिदी आणि मोहम्मद वासिम यांनी प्रत्येकी 3 गडी तर हॅरिस रौफने 2 गडी बाद केले. इफ्तिकार अहमद आणि उस्मा मीर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
बांगलादेशच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर सलामीच्या टी. हसनला पायचीत केले. यावेळी संघाचे खातेही उघडले नव्हते. त्यानंतर शाहिन आफ्रिदीने आपल्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला उस्मा मीरकरवी झेलबाद केले. त्याने 4 धावा जमविल्या. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या हॅरिस रौफने मुस्ताफिजूर रहिमला 5 धावावर रिझवानकडे झेल देण्यास भाग पाडले. बांगलादेशची स्थिती यावेळी 6 षटकात 3 बाद 23 अशी केविलवाणी होती. लिटन दास आणि अनुभवी मेहमुदुल्ला यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 79 धावांची भागिदारी केली. डावातील 21 व्या षटकात इफ्तिकार अहमदने दासला सलमानकरवी झेलबाद केले. दासने 64 चेंडूत 6 चौकारांसह 45 धावा जमविल्या. दास बाद झाल्यानंतर मेहमुदुल्ला अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. शाहिन आफ्रिदीने त्याचा त्रिफळा उडविला. मेहमुदुल्लाने 70 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 56 धावा जमविल्या. उस्मा मीरने रिदॉयला 7 धावांवर झेलबाद केले. कर्णधार शकिब अल हसन व मेहदी हसन मिराज यांनी सातव्या गड्यासाठी 45 धावांची भर घातली. हॅरिस रौफने शकिब अल हसनला सलमानकरवी झेलबाद केले. त्याने 64 चेंडूत 4 चौकारांसह 43 धावा जमविल्या. यानंतर मोहम्मद वासिमने बांगलादेशची शेपूट झटपट गुंडाळली. मोहम्मद वासिमने मिराजचा त्रिफळा उडविला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 30 चेंडूत 25 धावा जमविल्या. मोहम्मद वासिमने यानंतर तस्किन अहमद आणि मुस्तफिजूर रेहमान यांनाही त्रिफळाचीत करून बांगलादेशचा डाव 45.1 षटकात 204 धावात रोखला. बांगलादेशच्या डावामध्ये 3 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पहिल्या पॉवरप्लेत 37 धावा जमविताना 3 गडी गमवले. बांगलादेशचे पहिले अर्धशतक 67 चेंडूत, शतक 123 चेंडूत, दीडशतक 205 चेंडूत तर द्विशतक 258 चेंडूत फलकावर लागले. बांगलादेशने शेवटच्या पॉवरप्लेच्या 10 षटकांमध्ये 16 धावा जमविताना 3 फलंदाज गमावले. बांगलादेशतर्फे केवळ 4 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. या सामन्यात शाहिन आफ्रिदीने नजमुल हुसेन शांतोला झेलबाद केले आणि त्याने वनडेतील आपला 100 वा बळी नोंदविला. उस्मा मीरने उजवीकडे झेपावत हा अप्रतीम झेल टीपला.
संक्षिप्त धावफलक : बांगलादेश 45.1 षटकात सर्व बाद 204 (लिटन दास 64 चेंडूत 6 चौकारांसह 45, मेहमुदुल्ला 70 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 56, शकिब अल हसन 64 चेंडूत 4 चौकारांसह 43, मेहदी हसन मिराज 30 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 25, शाहिन आफ्रिदी 3-23, मोहम्मद वासिम 3-31, हॅरिस रौफ 2-36, इफ्तिकार अहमद 1-44, उस्मा मीर 1-66). पाकिस्तान 32.3 षटकांत 3 बाद 205 : अब्दुल्ला शफीक 69 चेंडूत 68, फखर झमान 74 चेंडूत 81, बाबर आझम 9, रिझवान 21 चेंडूत नाबाद 26, इफ्तिखार अहमद 15 चेंडूत नाबाद 17, अवांतर 4. मेहदी हसन मिराज 3-60.









