नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकचा 7 विकेटनी उडवला धुव्वा : वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग आठवा विजय
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. बुमराह, कुलदीप, जडेजाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 191 धावांत रोखले. यानंतर रोहित शर्मा व श्रेयस अय्यरच वादळी फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 192 धावांचे लक्ष्य 30.3 षटकात 7 विकेट राखून सहज पार केले. विशेष म्हणजे, विश्वचषकातील पाकविरुद्धचा भारताचा हा आठवा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने विश्वचषकामध्ये पाकविरुद्ध विजयाची पंरपरा कायम राखली.
वर्ल्डकपमधील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. तीन सामन्यात भारताचे 6 गुण झाले असून गुणतालिकेत भारत आता अव्वलस्थानावर विराजमान आहे. दरम्यान, मोक्याच्या क्षणी दोन बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. आता, टीम इंडियाचा पुढील सामना 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी होईल.
पाकिस्तानकडून मिळालेल्या 192 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. डेंग्यूमधून बरा झालेला शुबमन गिल 11 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 4 चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. मात्र विराटला मोठी खेळी साकारता आली नाही. त्याने 18 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या. हसन अलीच्या चेंडूवर मोहम्मद नवाजने त्याचा झेल घेतला.
रोहितची धमाकेदार खेळी, 63 चेंडूत केल्या 86 धावा
गिल, विराट बाद झाले असले तरी रोहित मात्र एकाबाजुने पाक गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. त्याने अवघ्या 36 चेंडूत अर्धशतक साजरे केले. हे त्याचे वनडेमधील 53 वे अर्धशतक ठरले. रोहित 63 चेंडूत 86 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचे शतक अवघ्या 14 धावांनी हुकले. यादरम्यान, रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 300 षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. रोहित व श्रेयस अय्यर यांनी तिसऱ्या गड्यासाठी 77 धावांची भागीदारी करत संघाचे दीडशतक फलकावर लावले. फटकेबाजीच्या प्रयत्नात रोहित 86 धावांवर बाद झाला. शाहिन आफ्रिदीने त्याला बाद केले. रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुलसह श्रेयस अय्यरने 30.3 षटकांत सामना संपवला. या दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद 36 धावांची भागीदारी केली. अय्यरने चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले आणि सामनाही संपवला. 62 चेंडूत 53 धावा करून तो नाबाद राहिला. केएल राहुलने 29 चेंडूत 19 धावा केल्या.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवताना भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. सलामीवीर अब्दुलाह शफीक आणि इमाम यांनी आश्वासक सुरुवात करताना 8 षटकांत 41 धावांची सलामी दिली. 20 धावांवर मोहम्मद सिराजने अब्दुलाह शफीक याला तंबूत धाडले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार लगावले. यानंतर बाबर आझम आणि इमाम यांनी डाव सावरम्याचा प्रयत्न केला. पण हार्दिक पंड्याने इमामला तंबूचा रस्ता दाखवला. इमामने 38 चेंडूत 6 चौकारासह 36 धावांचे योगदान दिले.
बाबर आझमची अर्धशतकी खेळी

इमाम बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवान यांनी एकेरी दुहेरी धावसंख्या करत संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनाही भारतीय आक्रमणाचा खंबीरपणे सामना केला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भागीदारी साकारत पाकिस्तानची धावसंख्याही 150 पार गेली. बाबरने 58 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 50 धावा जोडल्या. बाबरने यावेळी आपले अर्धशतक साजरे केले. या वर्ल्डकपमधील त्याची ही सर्वोत्तम खेळी होती. यामुळे बाबर मोठी खेळी साकारेल असेल वाटत होते. पण त्यावेळी मोहम्मद सिराज पुन्हा एकदा भारताच्या मदतीला धावून आला. सिराजने बाबरला क्लीन बोल्ड केले आणि तिथेच हा सामना भारताच्या दिशेने झुकला. बाबरची विकेट पडल्यानंतर पाकिस्तानचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. बाबर माघारी परतल्यानंतर इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली.
कुलदीपच्या एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट
33 व्या षटकांत कुलदीप यादवने सौद शकील (6) आणि इफ्तिकार अहमदला (4)़ तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर 34 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मोहम्मद रिझवानची दांडी गुल करत बुमराहने पाकिस्तानला जबर हादरा दिला. यामुळे पाकिस्तानची अवस्था 6 बाद 168 अशी झाली. त्यानंतर त्याने 36 व्या षटकातही खतरनाक गोलंदाजी करताना शादाब खानलाही क्लीन बोल्ड करत पाकिस्तानला सातवा धक्का दिला. रिझवानने 69 चेंडूत 7 चौकारासह 49 धावा केल्या. शादाब खानलाही मोठी खेळी करता आली नाही. शादाब दोन धावा काढून बाद झाला. मोहम्मद नवाजला हार्दिक पांड्याने चार धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. तर हसन अली याला 12 धावांवर जडेजाने शुभमन गिलकरवी झेलबाद केले. विशेष म्हणजे, चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे पाकचा संपूर्ण डाव 191 धावांत आटोपला.
टीम इंडियाच्या 5 गोलंदाजांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. फक्त शार्दुल ठाकूरला एकही विकेट मिळाली नाही.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान 42.5 षटकांत सर्वबाद 191 (अब्दुल्लाह शफीक 20, इमाम उल हक 36, बाबर आझम 50, मोहम्मद रिझवान 49, हसन अली 12, बुमराह 19 धावांत 2 बळी, कुलदीप 35 धावांत 2 बळी, जडेजा 38 धावांत 2 बळी, हार्दिक 34 धावांत 2 बळी, सिराज 50 धावांत 2 बळी).
भारत 30.3 षटकांत 3 बाद 192 (रोहित शर्मा 63 चेंडूत 86, शुबमन गिल 16, श्रेयस अय्यर 62 चेंडूत नाबाद 53, केएल राहुल नाबाद 19, शाहिन शाह आफ्रिदी 36 धावांत 2 बळी, हसन अली 1 बळी).
खचाखच मैदान, अरजित, शंकर महादेवनच्या आवाजाने चार चाँद

नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास एक लाखाहून अधिक प्रेक्षकांनी सामना पाहण्यासाठी उपस्थिती दर्शवली. मैदान भरण्यासाठी सकाळपासून सुरुवात झाली होती. रस्त्यांवर गर्दीच गर्दी दिसून येत होती. या महामुकाबल्यापूर्वी बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत एका रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अरजित सिंग, शंकर महादेवन, सुखविंदर सिंग, श्रद्धा कपूर आणि सुनिती चौहान यांनी परफॉर्मन्स करत लाखोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना प्रफुल्लित करून टाकले. बॉलिवूड कलाकारांनी दाखवलेल्या संगीतमय नजराणामुळे चाहत्यांना मेजवानी मिळाली. दरम्यान, सामन्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत झाले. भारतीय राष्ट्रगीत सुरु झाले असता एक वेगळा आणि अंगावर काटा आणणारा अनुभव अनुभवण्यास मिळाला. मैदानातील 1 लाख प्रेक्षकांनी एकत्रित राष्ट्रगीत गायले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
सचिन-वकार युनूसचा रुबाब
दरम्यान, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वकार युनिस हे सामन्यावेळी समालोचन करताना दिसून आले. रवी शास्त्राr यांच्यासोबत हे दोघे समालोचन करत होते. विशेष म्हणजे, तब्बल 34 वर्षांनी दोन्ही खेळाडू दोन्ही आपापल्या संघाला चिअर करताना दिसून आले. इतकेच नव्हे तर 1989 मध्ये सचिन तेंडुलकर सोळा वर्षे होता तेव्हा पाकविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पदार्पण केले होते. वकार युनूसने देखील पाकिस्तानसाठी दमदार कामगिरी करत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
हार्दिक पंड्याचा मंत्र अन् पुढील चेंडूवर विकेट

पाकचा सलामीवीर अब्दुल्ला शफिकला सिरजाने बाद केल्यानंतर इमाम उल-हकला हार्दिक पंड्याने माघारी पाठवले. इमामला बाद करण्याआधी हार्दिक पंड्याने असे काही कृत्य केले ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या डावातील 13 व्या ओव्हरमध्ये हार्दिक गोलंदाजी करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर इमाम स्ट्राईकवर होता. त्याने हार्दिकला चौकार मारला. यावर हार्दिक नाराज झालेला दिसला. यानंतर तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी चेंडू दोन्ही हातांनी पकडून हार्दिक आपले डोळे बंद करत काहीतरी बोलला. त्यानंतर या चेंडूवर त्याने इमामला केएल राहुलकरवी झेलबाद केले. दरम्यान, हार्दिक चेंडूकडे पाहून काही तरी बोलला. हार्दिक चेंडूशी नेमक काय बोलला, याची चर्चा सोशल मीडियावर सुरु असल्याचे पहायला मिळाले.
हिटमॅनने वनडेत ठोकली षटकारांची ‘ट्रिपल सेंच्युरी’

पाकविरुद्ध लढतीत भारतीय कर्णधार रोहित शर्माने 63 चेंडूत 6 चौकार व 6 षटकारासह 86 धावा करताना महत्वपूर्ण कामगिरी बजावली. या धावांदरम्यान रोहितने वनडे क्रिकेटमध्ये 300 षटकार पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे. रोहितच्या आधी वनडेमध्ये 300 षटकार मारणारे शाहिद आफ्रिदी व ख्रिस गेल हे दोन खेळाडू आहेत.
वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –
351 – शाहिद आफ्रिदी (398 सामने)
331 – ख्रिस गेल (301 सामने)
303 – रोहित शर्मा (254 सामने)
270 – सनथ जयसूर्या (445 सामने)
229 – एमएस धोनी (350 सामने)
वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा विक्रमी आठवा विजय
एक लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारतीय संघाने सलग आठव्यांदा पाकिस्तानचा आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये पराभव केला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानवर 7 विकेटनी विजय मिळवला. विशेष म्हणजे, भारताची वर्ल्डकपमधील पाकविरुद्ध विजयाची परंपरा कायम राहिली.
वर्ल्डकपमधील भारताचे पाकिस्तानवरील विजय-
1992- भारताचा 43 धावांनी विजय
1996- भारताचा 39 धावांनी विजय
1999- भारताचा 47 धावांनी विजय
2003- भारताचा 6 विकेटनी विजय
2011- भारताचा 29 धावांनी विजय
2015- भारताचा 76 धावांनी विजय
2019- भारताचा 89 धावांनी विजय
2023- भारताचा 7 विकेटनी विजय









