वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2025-26 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लीग स्पर्धेत पाक हॉकी संघाचा सहभाग निश्चित राहणार असून त्यांचे यजमान भारताबरोबर दोन सामने होणार आहेत. सदर माहिती आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रवक्त्यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
2025-26 प्रो लीग हंगामासाठी पाठविण्यात आलेले निमंत्रण पाक पुरुष हॉकी संघाने स्वीकारले आहे. पाकच्या सहभागामुळे आता हॉकी शौकिनांचे लक्ष भारत-पाक लढतीवर राहील. 2025-26 च्या प्रो लीग हॉकी हंगामासाठी पाक हॉकी संघाला खास निमंत्रण देण्यात आले होते. 2024-25 च्या प्रो हॉकी लीग हंगामात भारतीय पुरूष हॉकी संघाने भुवनेश्वरमध्ये आठ सामने खेळले असून अॅमस्टरडॅम आणि अँटवेर्फ येथे प्रत्येकी चार सामने खेळले आहेत.चालु वर्षाच्या प्रारंभी मलेशियात झालेल्या हॉकी नेशन्स चषक स्पर्धेत पाक संघाला पदोन्नती देण्यात आली. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या हॉकी प्रो लीग स्पर्धेमध्ये पाक, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, इंग्लंड, जर्मनी, भारत, नेदरलँड्स आणि स्पेन यांचा समावेश असून आता त्यामध्ये पाकची भर पडली आहे.









