दुसऱ्या सामन्यात पाकचा थरारक विजय, गुरबाजचे शतक वाया, इमाम उल हक, बाबर आझम यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ हंबनटोटा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकने अफगाणवर 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली. या मालिकेतील झालेल्या दुसऱ्या अटीतटीच्या वनडे सामन्यात पाकने शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर अफगाणचा केवळ एका गड्याने पराभव केला. अफगाणतर्फे रहिमतुल्ला गुरबाजने झळकवलेले दीडशतक (151) मात्र वाया गेले. पाकतर्फे इमाम उल हक आणि कर्णधार बाबर यांनी समयोचित अर्धशतके झळकवली. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना कोलंबोत 26 ऑगस्ट शनिवारी होत आहे.
दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदजी करताना अफगाणने 50 षटकात 5 बाद 300 धावा जमवत पाकला विजयासाठी 301 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर पाकने 49.5 षटकात 9 बाद 302 धावा जमवत हा सामना एक चेंडू बाकी एक गड्यांनी जिंकत मालिका सिलबंद केली. या सामन्यात दोन्ही संघाकडून 600 पेक्षा अधिक नोंदवल्या गेल्याने खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असल्याचे दिसून आले. पाकला या सामन्यात शेवटच्या दोन षटकामध्ये विजयासाठी 27 धावांची जरुरी होती 49 व्या षटकातील चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शदाब खानने षटकार आणि चौकार ठोकत आपल्या संघाला विजयाच्या समीप नेले. त्यानंतर पाकच्या डावातील शेवटचे षटक फरुकीने टाकले. या शेवटच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शदाब खान धावचित झाला. त्यानंतर नसीम शहाने डावातील एक चेंडू बाकी असताना पाकला थरारक विजय मिळवून दिला.

अफगाणच्या डावाला गुरबाज आणि इब्राहिम झेद्रान यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जोडीने पाकच्या गोलंदाजीची धुलाई करताना 39.5 षटकात 227 धावांची द्विशतकी भागीदारी केली. अफगाणतर्फे वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही गड्यासाठीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे. गुरुबाजने 151 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारासह 151 धावा झोडपल्या. पाकविरुद्ध अफगाणची ही वनडे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या असून पाक संघाविरुद्ध पहिले शतक नोंदवणारा गुरबाज हा पहिला फलंदाज आहे. गुरुबाजचे हे वनडे क्रिकेटमधील पाचवे शतक आहे. यापुर्वी अफगाणतर्फे हसमतुल्ला शाहिदीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वोच्च म्हणजे नाबाद 97 धावा झळकवल्या होत्या. डावातील 40 व्या षटकात पाकच्या उस्मा मीरने झेद्रानला झेलबाद केले. त्याने 101 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 80 धावा जमवल्या. यानंतर गुरबाज शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. मोहमद नबीने 29 चेंडूत 3 चौकारासह 29 धावा केल्या. रशीद खान 2 तर शाहीदुल्ला एका धावेवर बाद झाले. हसमतुल्ला शाहिदीने 11 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 15 तर अब्दुल रेहमानने नाबाद 4 धावा जमवल्या. अफगाणच्या डावात 5 षटकार आणि 25 चौकार नोंदवले गेले. अफगाणने पहिल्या पॉवरप्लेमधील 10 षटकात 48 धावा जमवल्या होत्या. गुरबाज आणि झेद्रान यांनी द्विशतकी भागीदारी 222 चेंडूत झळकवली. तिसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात अफगाणने 73 धावा जमवताना चार गडी गमवले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 2 तर नसीम शहा आणि उस्मा मीर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये इमाम उल हकने 105 चेंडूत 4 चौकारासह 91 धावा जमवताना फक्र झमान समवेत सलामीच्या गड्यासाठी 9 षटकात 52 धावांची भागीदारी केली. झमानने 34 चेंडूत 4 चौकारासह 30 धावा जमवल्या. फरुकीने झमानचा त्रिफळा उडवला. इमाम उल हक व कर्णधार बाबर यांनी दुसऱ्या गड्यासाठी 118 धावांची शतकी भागीदारी नोंदवली. फरुकीने बाबर आझमला झेलबाद केले. त्याने 66 चेंडूत 6 चौकारासह 53 धावा जमवल्या. मोहमद रिझवान एकेरी धाव घेण्याच्या नादात धावचित झाला. त्याने 2 धावा जमवल्या. मोहमद नबीने आगा सलमानला झेलबाद केले. त्याने 2 चौकारासह 14 धावा केल्या. मोहमद नबीने उस्मा मीरला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. पाकची यावेळी स्थिती 5 बाद 208 अशी होती. इमाम हकने 105 चेंडूत 4 चौकारासह 91 धावा जमवल्या आणि तो मुजीब उर रेहमानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इफ्तिकार अहमदने 1 चौकारासह 17 धावा केल्या. शदाब खानने 35 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 48 धावा जमवल्या आणि तो नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. शदाब खान बाद झाला त्यावेळी पाकला विजयासाठी एका षटकात 7 धावांची जरुरी होती. शाहीन आफ्रिदी 4 धावावर झेलबाद झाला. नसीम शहाने 2 चौकारासह नाबाद 10 तर हॅरीस रौफने नाबाद 3 धावा जमवत पाकला विजय मिळवून दिला. पाकच्या डावात 1 षटकार आणि 23 चौकार नोंदवले गेले. अफगाणतर्फे फरुकीने 3 तर नबीने 2 त्याचप्रमाणे मुजीब उर रेहमान व आणि अब्दुल रेहमान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 65 धावा जमवताना 1 गडी गमवला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 ते 40 षटकापर्यंत 155 धावा जमवताना 5 गडी गामवले. तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी 40 ते 50 दरम्यानच्या षटकात 82 धावा जमवताना 3 गडी गमवले.
संक्षिप्त धावफलक : अफगाण 50 षटकात 5 बाद 300 (रेहमतुल्ला गुरबाज 151, इब्राहिम झेद्रान 80, नबी 29, हसमतुल्ला शाहिदी नाबाद 15, अब्दुल रेहमान नाबाद 4, अवांतर 18, शाहिन आफ्रिदी 2-58, नसीम शहा 1-45, उस्मा मीर 1-61), पाक 49.5 षटकात 9 बाद 302 (फक्र झमान 30, इमाम उल हक 91, बाबर 53, रिझवान 2, सलमान 14, इफ्तिकार अहमद 17, शदाब खान 48, नसीम शहा नाबाद 10, हॅरीस रौफ नाबाद 3, अवांतर 30, फरुकी 3-69, नबी 2-46, मुझीब उर रेहमान 1-45, अब्दुल रेहमान 1-83).









