वृत्तसंस्था/ कोलकाता
उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर पडलेल्या पाकिस्तानचा सामना आज मंगळवारी विश्वचषकातील सामन्यात त्यांच्याप्रमाणे संघर्ष करणाऱ्या बांगलादेशशी पडणार आहे. यावेळी चार सामन्यांतील पराभवांची मालिका संपविण्यास पाकिस्तान उत्सुक असेल. त्यांच्यासाठी हा सामना ‘जिंकू किंवा मरू’ पद्धतीचा असून त्यांचे फक्त चार गुण झाले आहेत आणि ते लीग टप्प्याचा शेवट होईपर्यंत त्यात जास्तीत जास्त सहा गुण जोडू शकतात.
तीन संघ आधीच पाकिस्तानच्या वर आहेत आणि जर असे असताना देखील पाकने बाद फेरीत प्रवेश केला, तर तो एक प्रकारचा चमत्कारच ठरेल. कारण ऑस्ट्रेलियाने आपला फॉर्म परत मिळवला आहे आणि न्यूझीलंड देखील या स्पर्धेत पराभूत करण्यास सर्वांत कठीण संघांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. शिवाय आजच्या घडीला भारत आणि दक्षिण आफ्रिका यांचे बाद फेरीत पोहोचणे निश्चित झाल्यात जमा आहे. अशा स्थितीत पाकिस्तानसमोरील वाट खडतर असून त्यांना आव्हान टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने केवळ राहिलेले सामने जिंकावे लागणार नाहीत, तर निव्वळ धावसरासरी (सध्या उणे 0.205) वाढवण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावे लागतील. पण बांगलादेशविऊद्ध पराभव झाल्यास पाकिस्तान निश्चितच स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल.
अशा परिस्थितीत पाकिस्तानचे खेळाडू पूर्णपणे झोकून देऊन खेळण्याची अपेक्षा आहे. त्यांचे फलंदाज सहापैकी चार सामन्यांमध्ये 50 षटके टिकून राहण्यात अपयशी ठरले आहेत. मात्र त्यांची गोलंदाजी चमकली आहे. वेगवान गोलंदाजांना पोषक ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर शाहीन शाह आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि मोहम्मद वसिम हे बांगलादेशला सुरुवातीलाच धक्के देऊन लवकर गुंडाळण्याची अपेक्षा बाळगून असतील. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहम्मद वसिम ज्युनियरने केलेली चांगली गोलंदाजी ही त्यांच्यासाठी एक सकारात्मक बाब आहे. हसन अलीची जागा घेऊन त्याने विश्वचषकात पदार्पण केले आहे.
फलंदाजी ही पाकिस्तानसाठी सर्वांत मोठी निराशा ठरली आहे. कर्णधार बाबर आझम चांगली सुरुवात करूनही त्याचे रुपांतर मोठ्या धावसंख्येमध्ये करू शकलेला नाही. बांगलादेशविऊद्ध तो ती कसर दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू शकतो. दुसरीकडे, शाकिब उल हसनच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या गोटात काहीच ठीक नाही. त्यांचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. नेदरलँड्सविऊद्धच्या मागील सामन्यात त्यांच्या पहिल्या सहा फलंदाजांपैकी चार फलंदाज दुहेरी आकड्यातील धावसंख्याही नोंदवू शकले नाहीत आणि 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा डाव 142 धावांवर आटोपला. बांगला टायगर्सचा हा सहावा पराभव होता. बांगलादेशचे फक्त दोन गुण झाले आहेत.
संघ : पाकिस्तान-बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिकार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसिम.
बांगलादेश-शाकिब उल हसन (कर्णधार), लिटन दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो, तौहीद हृदॉय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराझ, नसुम अहमद, महेदी हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, शोरिफूल इस्लाम, तनझिम हसन साकिब.
सामन्याची वेळ : दुपारी 2 वा.









