वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचा फलंदाज इफ्तिखार अहमदने पाकिस्तान सुपरलीगमधील प्रदर्शनीय सामन्यात क्वेटा ग्लॅडिएटर्सतर्फे खेळताना एका षटकात 6 षटकार मारण्याचा पाकिस्तानतर्फे पराक्रम केला.
पाकचा माजी गोलंदाज वहाब रियाझने टाकलेल्या ग्लॅडिएटर्सच्या शेवटच्या षटकात इफ्तिखारने सहाही चेंडूवर षटकार ठोकले. अंतिम षटकाआधी इफ्तिखारने 44 चेंडूत 58 धावा फटकावल्या होत्या. पण या षटकानंतर तो 50 चेंडूत 94 धावांवर पोहोचला. 20 षटकाअखेर क्वेटाने 5 बाद 184 धावा जमविल्या. या षटकाआधी त्यांची धावसंख्या 5 बाद 148 अशी होती. इफ्तिखारने पाकतर्फे 204 टी-20 सामने खेळले असून 186 डावांत त्याने 29.08 च्या सरासरीने 3956 धावा जमविल्या आहेत. 127.24 असा त्याचा स्ट्राईकरेट आहे. त्यात एक शतक व 25 अर्धशतकांचा समावेश आहे.
इफ्तिखारच्या आधी एकूण 10 फलंदाजांनी षटकार 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. विंडीजच्या गॅरी सोबर्स यांनी सर्वप्रथम 6 षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता. 1968 मध्ये कौंटी चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी हा विक्रम नोंदवला होता. 1985 मध्ये भारताच्या रवी शास्त्री यांनी रणजी करंडक सामन्यात बडोदाविरुद्ध खेळताना या विक्रमाची पुनरावृत्ती केली. याशिवाय हर्षल गिब्ज, युवराज सिंग आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वप्रथम सहा षटकार ठोकले. विंडीजचा कायरन पोलार्ड हा त्यातील तिसरा फलंदाज आहे. त्याने 2021 मध्ये लंकेविरुद्ध टी-20 सामन्यात हा विक्रम नोंदवला.









