वृत्तसंस्था / इस्लामाबाद
2023 साली भारतात होणाऱ्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाच्या सहभागाबाबत निर्णय घेण्यासाठी पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीच्या प्रमुखपदी पाकचे विदेश मंत्री बिलावल भुत्तो यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या महत्त्वाच्या स्पर्धेत पाकचा राष्ट्रीय क्रिकेट संघ पाठवावा किंवा नाही या संदर्भात अंतिम निर्णय पाकची ही उच्चस्तरीय समिती घेणार आहे. दरम्यान पाक आणि भारत याच्यातील राजकीय संबंध तसेच पाक शासनाच्या क्रीडा विषयी धोरण, भारतामध्ये पाकचे क्रिकेटपटू अधिकारी, क्रिकेट शौकीन आणि प्रसारमाध्यम यांच्या परिस्थितीचा आढावा सदर समिती घेणार असून त्यानंतर ही वरिष्ठ उच्चस्तरीय समिती आपला अहवाल पंतप्रधान शहबाज शरीफ यांना सादर करणार आहे. पाकचे पंतप्रधान हे पीसीबीचे कायमस्वरुपी अध्यक्ष असल्याने ते अंतिम निर्णय घेतील.
2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसी आणि यजमान बीसीसीआयने यापूर्वीच घोषित केले आहे. 5 ऑक्टोबरपासून या स्पर्धेला भारतात प्रारंभ होणार आहे. साहजिकच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष आतापासूनच लागले आहे. पाकच्या नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीमध्ये पाकचे क्रीडा मंत्री एहसान मझारी, एम. औरंगजेब, आसद मेहमूद, अमिन उल हक, कमार झमान खेरा, तारिक फतमी यांचा समावेश आहे. या स्पर्धेवेळी भारतातील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता पीसीबीकडून एक सुरक्षा पथक भारतात येणार असल्याचे सांगण्यात आले. या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला शौकिनांकडून प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याने हा सामना 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मोदी स्टेडियम हे सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते. पाकचा संघ भारतात या स्पर्धेपूर्वी दोन सरावाचे सामने हैदराबादमध्ये खेळणार आहे. त्यानंतर पाक आणि नेदरलँड्स तसेच पाक आणि श्रीलंका यांच्यातील पहिले दोन सामने हैदराबादमध्ये होतील. पाकचे या स्पर्धेतील अन्य सामने चेन्नई, बेंगळूर आणि कोलकाता येथे होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने आतापर्यंत आशिया चषक किंवा आयसीसीच्या स्पर्धामध्ये खेळवले गेले आहेत.









