टूलकिट’च्या साथीने ‘आयएसआय’चे कारस्थान
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यात व्यत्यय आणण्यासाठी आयएसआयची द्वेषपूर्ण टूलकिट योजना तयार केल्याची माहिती उघड झाली आहे. पंतप्रधान मंगळवारी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. अमेरिकेच्या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याचदरम्यान, भारताविरोधात पाकिस्तानने मोठे षड्यंत्र रचल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत अमेरिकेत सक्रिय खलिस्तान समर्थक संघटना तसेच भारताविरोधात काम करणाऱ्या अनेक गटांशी बैठक घेतल्याचा दावा केला जात आहे.
पंतप्रधानांचा दौरा 21 जूनपासून सुरू होत आहे. या काळात पंतप्रधान व्हाईट हाऊसलाही भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी 22 जून रोजी मोदींसाठी विशेष मेजवानीचे आयोजन केले आहे. या दौऱ्यादरम्यान 22 जून रोजी पंतप्रधान मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. या दौऱ्यावेळीच मोदींविरोधात मोठे कट-कारस्थान रचण्यात आले आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ने अमेरिकेत सक्रिय असलेल्या अनेक खलिस्तान समर्थित संघटनांसोबत तसेच भारताविरोधात काम करणाऱ्या अनेक गटांशी बैठका घेतल्याचे समजते.
ट्विटर टेंड, निषेध रॅली अन् पोस्टर्स…
पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याला विरोध करण्यासाठी आयएसआय गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेत सक्रिय आहे. भारताविऊद्ध कट रचण्यासाठी अनेक संघटनांना निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आल्यामुळे पाकिस्तान चिंतेत आहे. भारताची वाढती विश्वासार्हता पाकिस्तानला पसंत नसल्यामुळेच पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी एक टूलकिटही तयार करण्यात आली आहे. या टूल किटमध्ये भारताला कोणत्या मार्गाने विरोध करायचा आणि कोणत्या ठिकाणी आंदोलन करायचे याचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. एवढेच नाही तर आंदोलनादरम्यान कोणते पोस्टरबाजी करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या भारतविरोधी आंदोलनाची तयारी पूर्ण झाली असून ठराविक जणांना जबाबदारीचे वाटपही करण्यात आले आहे. तसेच आंदोलकांना निषेधाच्याठिकाणी नेण्यासाठी बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
भारतविरोधी प्रचारासाठी बनवले संकेतस्थळ
भारताविऊद्ध कट रचण्यासाठी एक खास वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. या वेबसाईटमध्ये भारताविऊद्ध कट रचता यावा यासाठी सर्व लोकांना स्वत:ची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. आयएसआयने भारताविरोधात रचलेल्या कटानुसार अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी निश्चित केलेल्या मार्गांवर भारतविरोधी व मोदींविरोधी पोस्टर्स लावण्याची तयारी करण्यात आली आहे.
हॅशटॅग तयार
निषेधाला उत्तेजन देण्यासाठी ष्श्द्ग्ऱ्दांत्म्दस सारखे हॅशटॅग देखील तयार केले गेले आहेत. यावर भारतीय सैन्याविरुद्ध मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित बनावट प्रचारासह पोस्टर्सचा समावेश आहे. जगभरातील भारताची वाढती विश्वासार्हता डागाळण्यासाठी ‘आयएसआय’ने यापूर्वीही असेच षड्यंत्र रचले होते. विशेषत: नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानानंतर पाकिस्तानातून सोशल मीडियावर अनेक भारतविरोधी हॅशटॅग ट्रेंड झाले होते.









