केवळ व्हर्च्युअल उपस्थिती दर्शवणार : 27-28 एप्रिलला परिषद
► वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची (‘एससीओ’) बैठक 27-28 एप्रिल रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे होणार आहे. भारताने सर्व ‘एससीओ’ सदस्यांना बैठकीसाठी आमंत्रित केले होते. मात्र, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ हे या आठवड्यात दिल्लीत होणाऱ्या ‘एससीओ’ बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता मावळली आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांची भारतविरोधी वृत्ती हे ख्वाजा आसिफ यांचे दिल्लीत न येण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.
पाकिस्तानचे वृत्तपत्र ‘द एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात होणाऱ्या शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) बैठकीत पाकिस्तानी मंत्री ख्वाजा आसिफ यांची प्रत्यक्ष उपस्थिती शक्मय होणार नाही. असिफ आता या शिखर परिषदेत व्हर्च्युअल प्रणालीद्वारे सामील होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता आसिफ भारतात आले नाहीत तर पुढील महिन्यात 4 आणि 5 मे रोजी होणाऱ्या बैठकीसाठी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्रीही दिल्लीत येऊ शकणार नाहीत, असेही बोलले जात आहे. ख्वाजा आसिफ आणि बिलावल या दोन्ही पाकिस्तानी नेत्यांनी यापूर्वी उघडपणे भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्ये केलेली आहेत. त्यामुळे भारतात पाकिस्तानविषयी प्रचंड नाराजी आहेत. तसेच राजकीय व प्रशासकीय पातळीवरही भारत पाकिस्तानवर नाराज आहे. अलीकडेच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पनामा सिटीमध्ये अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर टीका केली होती. आमच्या विरोधात सीमेपलीकडून दहशतवाद करणाऱ्या शेजाऱ्याशी संबंध ठेवणे आपल्यासाठी खूप अवघड आहे, असे ते म्हणाले होते.
भारत, रशिया आणि चीनसारखे देश शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनचे (एससीओ) स्थायी सदस्य आहेत. या संघटनेतील या तीन देशांव्यतिरिक्त कझाकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि पाकिस्तान हे ‘एससीओ’चे सदस्य आहेत. या सदस्य देशांव्यतिरिक्त, दोन निरीक्षक देश बेलारुस आणि इराण देखील एससीओ संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये या संघटनेत पूर्ण सदस्य म्हणून सामील झाले होते.









