तिसऱ्या वनडेत 202 धावांनी उडवला धुव्वा : 34 वर्षानंतर विंडीजचा पाकवर वनडे मालिकाविजय
वृत्तसंस्था/त्रिनिदाद
शाय होपच्या नेतृत्त्वाखालील वेस्ट इंडिज संघाने बुधवारी पाकिस्तानचा तब्बल 202 धावांनी पराभव केला. यासह विंडीजने 2-1 ने तीन सामन्यांची वनडे मालिका आपल्या नावे केली. विशेष म्हणजे, 34 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकण्यात यश मिळवले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने होपच्या शतकाच्या जोरावर 6 गडी गमावून 294 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 92 धावांवर ऑलआउट झाला. 18 धावांत 6 बळी घेणारा जेडेन सील्स सामन्याचा मानकरी ठरला. मंगळवारी त्रिनिदादमधील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 50 षटकांत 6 गडी गमावून 294 धावा केल्या.
विंडीजच्या डावाची सुरुवात खराब झाली. ब्रेंडॉन किंग (5), एव्हिन लुईस (37) आणि केसी कार्टी (17) स्वस्तात माघारी परतल्यानंतर कर्णधार होपने संघाचा मोर्चा सांभाळला. त्याने वनडेतील 18 वे शतक झळकावताना 94 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारासह नाबाद 120 धावांचे योगदान दिले. याशिवाय, शेरफेन रुदरफोर्ड (15), रोस्टन चेस (36) आणि गुडाकेश मोती (5) धावा केल्या. मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यानंतर कर्णधार होपला जस्टीन ग्रीव्हजने साथ दिली. या जोडीने सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला 294 धावापर्यंत मजल मारुन दिली. ग्रीव्हजने 24 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारासह नाबाद 43 धावा केल्या. पाककडून नसीम शाह आणि अब्रार अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
पाकचे सपशेल लोटांगण
मालिकेच्या निर्णायक सामन्यात विजयासाठी पाकिस्तानसमोर 295 धावांचे लक्ष्य होते. पण, धावांचा पाठलाग करताना पाकचा डाव पत्त्यासारखा कोसळला. पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना भोपळादेखील फोडता आला नाही. बाबर आझम 9 धावा करत बाद झाला. तर मोहम्मद रिझवानने चेंडू सोडला आणि तो बाद झाला. याशिवाय सलमान आगाने 30 धावांची सर्वात मोठी खेळी केली. अवघ्या 92 धावांवर संपूर्ण पाकिस्तानचा संघ गारद झाला. परिणामी, वेस्ट इंडिजने 202 धावांनी सामना जिंकला, जो धावांच्या बाबतीत पाकिस्तानवरील त्यांचा सर्वात मोठा विजय आहे. सील्सने 7 षटकांत 18 धावांच्या मोबदल्यात 6 बळी घेत विंडीजच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. गुडाकेश मोतीने 2 तर रोस्टन चेसने 1 बळी घेतला.
विंडीजचा चौथा मोठा विजय
वनडेच्या आतापर्यंतच्या इतिहासात वेस्ट इंडिजच्या संघाने 2011 मध्ये सर्वात मोठा विजय नोंदवला होता. नेदरलँड्स संघाला त्यांनी 215 धावांनी पराभूत केले होते. याशिवाय 2010 मध्ये कॅनडाच्या संघाविरुद्ध वेस्ट इंडिज संघाने 208 धावांनी विजय मिळवला होता. 2014 मध्ये न्यूझीलंडच्या संघाला त्यांनी 203 धावांनी मात दिली होती. पाकविरुद्ध मिळवलेला विजय या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
विंडीजच्या क्रिकेट इतिहासातील संस्मरणीय क्षण
विंडीजने पाकविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयासह मालिकाही आपल्या नावे केली. यासह वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा 34 वर्षांनी वनडे मालिकेत पराभव केला आहे. 1991 नंतर वेस्ट इंडिजने पाकविरुद्धची पहिली एकदिवसीय मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे, हा विजय वेस्ट इंडिजच्या क्रिकेट इतिहासातील एक संस्मरणीय क्षण ठरला आहे. या ऐतिहासिक यशानंतर विंडीज संघाने मैदानावर एकच जल्लोष केला.
पाकवर मोठ्या फरकाने पराभवाची नामुष्की
1975 पासून पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले जात आहेत, परंतु प्रथमच पाकचा संघ कॅरेबियन संघाविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला आहे. आतापर्यंत 150 धावांचा पराभव हा वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील पाकिस्तानचा सर्वात लज्जास्पद पराभव होता, परंतु 12 ऑगस्ट रोजी हा विक्रम आणखी लज्जास्पद बनला, जेव्हा पाकिस्तानच्या संघाला चौथ्यांदा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 200 किंवा त्याहून अधिक धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संपूर्ण संघ फक्त 92 धावांवर ऑलआउट झाला. पाकिस्तानचा एकदिवसीय संघ यापूर्वी फेब्रुवारी 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 150 धावांनी पराभूत झाला होता, जो पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंतचा सर्वात लाजिरवाणा पराभव होता. पाकिस्तान 2009 मध्ये श्रीलंकेविरुद्ध, 2023 मध्ये भारताविरुद्ध आणि 2002 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 200 पेक्षा जास्त धावांनी पराभूत झाला आहे.
संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान 50 षटकांत 6 बाद 294 (लुईस 37, शाय होप नाबाद 120, रोस्टन चेस 36, ग्रीव्हज नाबाद 43, नसीम शाह आणि अहमद प्रत्येकी दोन बळी). पाकिस्तान 29.2 षटकांत सर्वबाद 92 (सलमान आगा 30, हुसेन नवाज 13, मोहम्मद नवाज नाबाद 23, सील्स 18 धावांत 6 बळी, मोती 2 बळी).









