वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानने ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही, परंतु त्यांचा नवा कर्णधार शान मसूद आगामी दौऱ्याकडे ‘इतिहास बदलण्याची’ संधी या नात्याने पाहत आहे. बाबर आझमने क्रिकेटच्या सर्व स्वरुपांतील संघांचे कर्णधारपद सोडल्यानंतर 34 वर्षीय मसूदची अलीकडेच कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा खडतर दौरा ही कर्णधार या नात्याने मसूदची पहिली परीक्षा असेल.
संघ रवाना होण्यापूर्वी लाहोरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मसूदने सांगितले की, जेव्हा तुम्ही इतिहासात काहीही साध्य केलेले नसते तेव्हा तुम्हाला तो बदलण्याची संधी असते. म्हणून आम्ही पाकिस्तानसाठी आणि जागतिक कसोटी स्पर्धेच्या दृष्टीने सकारात्मक निकाल मिळविण्याचा प्रयत्न करू. श्रीलंकेविऊद्धच्या दोन्ही कसोटीत विजय मिळविल्याने पाकिस्तान ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप’च्या 2023 ते 25 या टप्प्यासाठीच्या गुणतालिकेत आघाडीवर आहे, तर नऊ संघांच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.
पण यंदा जागतिक कसोटी स्पर्धा आणि एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक जिंकत ऑस्ट्रेलियाने उंच भरारी घेतली आहे. 14 डिसेंबरपासून पर्थ येथील पहिल्या सामन्याने पाक-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेला सुऊवात होईल. त्यानंतर मेलबर्न (26-30 डिसेंबर) आणि सिडनी (3-7 जानेवारी) येथे कसोटी सामने होतील. पाकिस्तानने त्यांच्या मागील दौऱ्यात दोन्ही कसोटी सामने डावाने गमावले होते. त्यात मसूदही संघाचा भाग होता.
‘आम्ही 400 धावा काढण्याची गरज असून नंतर 20 बळी घ्यायचे आहेत. आम्हाला 2019 मधील आमच्या मागील दौऱ्यात तसे करता आले नाही. म्हणून यावेळी ते लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असे मसूदने सांगितले. मसूदने मान्य केले की, सध्या ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. आम्ही चांगली कामगिरी करू शकू हा विश्वास असायला हवा आणि ऑस्ट्रेलियासमोर खडतर आव्हान उभे करण्याच्या दृष्टीने संघातील सर्व खेळाडूंनी योगदान द्यायला हवे. या मालिकेसाठी पाकिस्तान संघाने चांगली तयारी केली आहे, असे मसूदने आवर्जुन सांगितले.









