आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्या केल्या खाली : पाकिस्तानी झेंडेही काढून टाकल्याचे स्पष्ट
वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली
पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताकडून जोरदार तयारी सुरू असताना दोन्ही देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरील काही चौक्यांवरून पाकिस्तानी सैनिकांनी माघार घेतल्याचे समोर आले आहे. पहलगाम हल्ल्याच्या आठ दिवसांनंतर बुधवारी पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या. पाकिस्तानी सैन्याने या चौक्यांवरील झेंडेही काढून टाकले आहेत. कठुआच्या परगल भागातील बऱ्याच चौक्या खाली करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. याचदरम्यान बुधवारी पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या नव्या कुरापतीला भारतीय सैन्याने लगेच प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहागाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला मोकळीक दिली आहे. सैन्याने स्वत:च्या सोयीनुसार ठिकाण, वेळ आणि प्रत्युत्तर निवडले पाहिजे, असे निर्देश पंतप्रधानांनी सुरक्षा दलांना दिले आहेत. त्यानंतर आता पाकिस्तानने सावध पवित्रा घेत चौक्यावरील झेंडे काढून टाकले आहेत. तसेच मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी पाकिस्तानी सैन्याने आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक चौक्या रिकामी केल्या.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर तणाव कायम आहे. भारताने पहलगाम हल्ल्याला 26/11 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पहलगाम हल्ल्याचे वर्णन 26/11 नंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असे केले आहे. भारताच्या उप-स्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी प्रभावीपणे देशाची बाजू मांडली. पहलगाम दहशतवादी हल्ला हा नागरिकांवरील सर्वात मोठा हल्ला आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमापार दहशतवादाचा बळी ठरत असून आम्हाला याचे दु:ख मनापासून जाणवते, असे योजना पटेल म्हणाल्या.
भारतीय दूतावासातील 22 कर्मचारी मायदेशी
भारतीय राजदूतांनी पाकिस्तान सोडला आहे. बुधवारी अटारी-वाघा सीमेवरून दूतावासातील 22 कर्मचारी भारतात परतले. पाकिस्तानच्या कुरापती रोखण्यासाठी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. भारतीय राजनयिक अधिकाऱ्यांसाठी काही सूचना जारी करतानाच भारतात वास्तव्य करत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले होते.
एनआयएकडून तपास
पहलगाम हल्ल्याचा तपास करणाऱ्या एनआयएने बैसरन खोऱ्यातून 40 काडतुसे जप्त केली आहेत. एनआयएसोबत फॉरेन्सिक टीमचे दोन सदस्य देखील तपास करत आहेत. हे सदस्य स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने घनदाट जंगलात पुरावे गोळा करत आहेत.









