वृत्तसंस्था / लाहोर
पाकचा फलंदाज असिफ अलीने मंगळवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 33 वर्षीय असिफ अली हा फैसलाबादचा रहिवाशी असून त्याने 2021 आणि 2022 च्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकचे प्रतिनिधीत्व केले होते.
2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत त्याचा पाक संघामध्ये समावेश होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला असला तरी आपण यापुढे काही दिवस राष्ट्रीय आणि फ्रांचायझींच्या लीग क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे अलीने स्पष्ट केले. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या असिफ अलीने 21 वनडे आणि 58 टी-20 सामन्यात पाकचे प्रतिनिधीत्व करताना 959 धावा जमविल्या असून त्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 2018 साली झालेल्या आशिया चषक वनडे स्पर्धेत तसेच 2022 च्या आशिया चषक टी-20 स्पर्धेत त्याचप्रमाणे 2023 च्या हांगझोयु आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने पाकचे प्रतिनिधीत्व केले होते. 2021 साली झालेल्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अफगाण विरुद्धच्या सामन्यात पाक संघाला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी 24 धावांची जरुरी होती. असिफअलीने केवळ 7 चेंडूत 25 धावा झोडपत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यातील 19 व्या षटकात असिफअलीने अफगाणच्या करिम जेनतच्या षटकात सलग चार षटकार खेचले होते.









