मागील दोन महिन्यात दुसऱ्यांदा दौरा
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर हे दोन महिन्यांत दुसऱ्यांदा अमेरिकेला जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून जनरल असीम मुनीर हे यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) कमांडर जनरल मायकेल ई. कुरिल्ला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला भेट देणार आहेत. यापूर्वी, मुनीर यांनी जूनमध्ये अमेरिकेला भेट दिली होती. असीम मुनीर यांच्यानंतर पाकिस्तानचे हवाई दल प्रमुख झहीर अहमद बाबर सिद्धू यांनीही अमेरिकेला भेट दिली होती.
एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाविरुद्ध ‘टॅरिफ वॉर’ पुकारला असतानाच दुसरीकडे त्यांचे पाकिस्तानवरील प्रेम वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘सेंटकॉम’ कमांडर कुरिल्ला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुखाना अमेरिकेला बोलावण्यात आले आहे. फ्लोरिडातील टाम्पा येथील सेंटकॉम मुख्यालयात हा समारंभ होणार आहे. सेंटकॉमचे कमांडर जनरल मायकेल ई. कुरिल्ला यांनी जुलैच्या अखेरीस पाकिस्तानला भेट दिली.
यावर्षी जूनमध्ये असीम मुनीर यांनी अमेरिकेला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत डिनरही केले होते. दोघांची भेट सुमारे दोन तास चालली. मुनीर यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संभाव्य अणुयुद्ध रोखण्यासाठी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार देण्याची शिफारस केल्यानंतर काही दिवसातच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जनरल मुनीर यांना भेटण्यासाठी बोलावले होते. अमेरिकेने अलिकडेच लादलेल्या आयात शुल्कात पाकिस्तानला मोठी सूट देण्यात आली होती. ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानवरील शुल्क 29 टक्क्यांवरून 19 टक्के केले आहे. अमेरिकेन पाकिस्तानसोबत तेल करारही केला आहे. एवढेच नाही तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून पाकिस्तानला मिळालेल्या मदतीत अमेरिकेने मोठी भूमिका बजावली आहे.









