चीनच्या मदतीने संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था/ मॉस्को
विकसनशील देशांची संघटना ब्रिक्सच्या सातत्याने वाढणाऱ्या लोकप्रियतेदरम्यान आता पाकिस्तानने यात सामील होण्यासाठी अर्ज केला आहे. रशियाच्या वृत्तसंस्थेने यासंबंधीची माहिती दिली आहे. रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी अर्ज भरण्यासोबत ब्रिक्समध्ये सदस्यत्व मिळवून देण्यासाठी रशियाकडून मदत मागितली आहे.
2024 मध्ये ब्रिक्सचे सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी रशियाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आहे. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे मूळ सदस्य असलेल्या ब्रिक्समध्ये चालू वर्षी नव्या सदस्यांची भर पडली आहे. नव्या सदस्यांमध्ये अर्जेंटीना, इजिप्त, इथियोपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातचा समावेश आहे. ब्रिक्सची एकूण सदस्य संख्या आता 11 झाली आहे.
पुढील वर्षी रशियाकडे ब्रिक्सचे अध्यक्षत्व असणार आहे. याचमुळे पाकिस्तान रशियाकडून मदतीच अपेक्षा करत आहे. ब्रिक्सचे सदस्यत्व मिळविण्यासाठी पाकिस्तानला भारताची मनधरणी करावी लागणार आहे. याचमुळे पाकिस्तानने रशियाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. पाकिस्तानच्या सदस्यत्वाचा मुद्दा पुढील वर्षी रशियासमोर येणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा ब्रिक्समध्ये समावेश व्हावा म्हणून चीन देखील प्रयत्नशील आहे.
ब्रिक्सची पुढील शिखर परिषद रशियात होणार आहे. काही देशांना भागीदार सदस्याचा दर्जा देण्याची ब्रिक्सची योजना आहे. ब्रिक्सचा विस्तार दक्षिण अमेरिकेपर्यंत व्हावा अशी आमची इच्छा असल्याचे रशियाच्या उपविदेशमंत्र्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे ब्रिक्समध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यास भारताचा विरोध असल्याचे मानले जात आहे.
चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश रशियाच्या माध्यमातून भारतावर दबाव आणू पाहत आहेत. ब्रिक्सचा अधिक विस्तार झाल्यास ही संघटना कमकुवत ठरेल आणि स्वत:चे मुख्य लक्ष्य प्राप्त करू शकणार नाही तसेच सर्वसहमती निर्माण करणे सोपे ठरणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. यापूर्वी ब्रिक्सचे सदस्यत्व मिळविण्याचा प्रयत्न बेलारुसने केला होता, परंतु भारताने हा प्रयत्न रोखला होता.









