खैबर पख्तुनख्वामध्ये लढाऊ विमानातून बॉम्बवर्षाव : महिला-मुलांसह 30 जण ठार
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानने आता स्वत:च्याच लोकांवर हवाई हल्ला करताना जेएफ-17 लढाऊ विमानांमधून बॉम्ब टाकल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तुनख्वा येथील मात्रे दारा गावात हवाई हल्ला करत 30 नागरिकांना ठार केले. रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री 2 वाजता जेएफ-17 लढाऊ विमानांनी हा हल्ला केला. पाकिस्तानी हवाई दलाने तिराह खोऱ्यात किमान आठ एलएस-6 बॉम्ब टाकत पाच घरांना लक्ष्य केले.
पाकिस्तानी हवाई दलाने खैबर पख्तुनख्वा प्रांतात जोरदार बॉम्बहल्ला केल्याने किमान 30 लोक ठार झाले. मृतांमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये 35 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आणि लष्कराने अद्याप या हल्ल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पाकिस्तानी हवाई दलाने तिराह खोऱ्यातील एका गावावर किमान आठ एलएस-6 बॉम्ब टाकण्यासाठी जेएफ-17 लढाऊ विमानांचा वापर केला. पाकिस्तानी लष्कराने खैबर जिह्यातील तिराह भागात नागरिकांच्या घरांना लक्ष्य केले.
…हे तर हत्याकांड!
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, परिसरातील रहिवाशांनी खैबर पख्तुनख्वामध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलाने केलेला हा क्रूर नरसंहार असल्याचे वर्णन केले आहे. या हल्ल्यात मात्र दारा गाव प्रभावित झाले असून तेथे सर्वाधिक मृत्यू झाले. अनेक घरे कोसळल्यामुळे झोपलेले लोक गाडले गेले. सोमवारी दुपारी हल्ल्याच्या सुमारे 10 तासांनंतरही स्थानिक रहिवासी आणि बचाव पथके ढिगाऱ्याखाली मृतदेह शोधत होते. मृतांचा आकडा वाढू शकतो. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त एएमयू टीव्हीने स्थानिक रहिवाशांच्या हवाल्याने दिले आहे.
खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तान हे दोन पाकिस्तानी प्रांत असून तेथे सरकार आणि सुरक्षा दलाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. या प्रांतांमधील अनेक सशस्त्र गट पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य करत आहेत. हे गट प्रांतासाठी अधिक अधिकार आणि संसाधनांमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. पाकिस्तानी सरकार आणि लष्कर या बंडखोर गटांना दहशतवादी म्हणून संबोधतात.
पाकिस्तानी सैन्याने पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या सरकारविरोधी गटांना दडपण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी सैन्य नियमितपणे जमिनीवर कारवाई करते, परंतु रविवारी रात्री त्यांनी गावांवर बॉम्बहल्ला करण्यासाठी लढाऊ विमानांचा वापर केला. या प्रदेशातील नागरिकांना मारण्याचे आणि बेपत्ता करण्याचे गंभीर आरोप पाकिस्तानी सैन्यावर सातत्याने होत आहेत.









