तब्बल 103 दिवसानंतर पाकने जिंकला पहिला वनडे सामना : न्यूझीलंडवर 5 गड्यांनी मात
वृत्तसंस्था/ रावळपिंडी
फखर झमानच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने 103 दिवसांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये विजय मिळवला. रावळपिंडीत न्यूझीलंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना पाकिस्तानने 5 गडी राखून जिंकला. पाकिस्तानने जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. विशेष म्हणजे, पाकिस्तानचा हा 500 वा एकदिवसीय विजय आहे. या विजयासह पाकिस्तानने 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना डॅरेल मिचेलचे शतक आणि विल यंगच्या अर्धशतकाच्या जोरावर किवी संघाने 7 बाद 288 धावा केल्या. मिचेलने 115 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकारासह 113 धावा फटकावल्या. त्याचवेळी यंगने 78 चेंडूत 86 धावांची खेळी केली. त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले. यंग आणि मिशेल यांच्याशिवाय न्यूझीलंडकडून अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही. पाककडून शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ यांनी दोन गडी बाद केले तर शादाब खानने एक विकेट घेतली.
झमानचे शानदार शतक
प्रत्युतरादाखल 289 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाची सुरुवात दमदार झाली. फखर आणि इमाम उल हक यांच्यात 124 धावांची भागीदारी झाली. झमानने शानदार शतकी खेळी साकारताना 114 चेंडूत 13 चौकार व 1 षटकारासह 117 धावा फटकावल्या. तर इमामने 65 चेंडूत 60 धावा केल्या. सलामीवीर इमाम पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर बाबर आझमने 49 धावा करत फखरला चांगली साथ दिली. बाबरच्या रूपाने पाकिस्तानला 214 धावांवर दुसरा धक्का बसला. शान मसूदची बॅट फ्लॉप ठरली. त्याला केवळ 1 धाव करता आली. संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणल्यानंतर फखरही 42.2 षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानच्या 255 धावांत 4 विकेट पडल्यानंतर मोहम्मद रिझवानने जबाबदारी स्वीकारली. यादरम्यान आगा सलमानही बाद झाला, पण रिझवान एका बाजूला उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून देऊनच परतला. रिझवानने 34 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड 50 षटकांत 7 बाद 288 (विल यंग 86, मिचेल 113, टॉम लॅथम 20, हेन्री निकोल्स नाबाद 20, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह व हॅरिस रौफ प्रत्येकी दोन बळी)
पाकिस्तान 48.3 षटकांत 5 बाद 291 (फखर झमान 117, इमाम उल हक 60, बाबर आझम 49, रिझवान नाबाद 42, अॅडम मिल्ने 60 धावांत 2 बळी, मिचेल, टिकनर व रवींद्र प्रत्येकी एक बळी).









