युक्रेननचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला गंभीर आरोप
वृत्तसंस्था / कीव्ह
पाकिस्तानचे काही भाडोत्री सैनिक रशिया-युक्रेन युद्धात रशियाच्या बाजूने लढत आहेत, असा गंभीर आरोप युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. पाकिस्तानप्रमाणेच चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान तसेच आफ्रिकेतील काही देशांचे भाडोत्री सैनिकही रशियाच्या बाजूने लढत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. या देशांनी रशियाला मानवबळ पुरविणे थांबविले नाही, तर युव्रेन त्यांच्याविरोधात कारवाई करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
झेलेन्स्की यांनी सोमवारी युव्रेनच्या खारकीव्ह भागाचा दौरा केला. त्यावेळी त्यांच्या लक्षात ही परिस्थिती आणून देण्यात आली. त्यांनी या संबंधीची माहिती सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. युव्रेनच्या सैन्याधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिली आहे. युक्रेनच्या सैन्याशी लढणाऱ्या रशियन सैनिकांमध्ये पाकिस्तानी सैनिकही आहेत. तसेच, अन्य देशांचे नागरीकही आहेत. त्यामुळे आमचे सैनिक त्यांचाही खात्मा करतील, असे झेलेन्स्की यांनी संदेशात स्पष्ट केले आहे.
याआधीही केला होता आरोप
झेलेन्स्की यांनी याआधीही असाच आरोप केला होता. मॉस्को चीनच्या सैनिकांची भरती करत आहे, असे प्रतिपादन त्यांनी पूर्वी केले होते. तथापि, चीनने या आरोपांचा इन्कार केला होता. उत्तर कोरिया या देशानेही रशियाच्या कुर्स्क या सीमावर्ती भागात आपले हजारो सैनिक रशियाच्या बाजूने नियुक्त केले आहेत, असाही आरोप त्यांनी केला होता. तथापि, रशियाने तो नाकारलेला नाही.
रशिया आणि युक्रेनच्या बैठकी
रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध होत असताना एका बाजूला शांततेचे प्रयत्नही केले जात आहेत. दोन्ही देशांच्या सैनिक अधिकाऱ्यांनी तुर्कीये या देशाची राजधानी इस्तंबूल येथे गेल्या महिन्यापासून अनेक बैठका केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या अशा एका बैठकीत 1,200 युद्धबंदींच्या संदर्भात एक समझोता करण्यात आला आहे. या समझोत्याअंतर्गत दोन्ही देश एकमेकांकडे असणाऱ्या युद्धबंदींचे हस्तांतरण करणार आहेत. एका वृत्तसंस्थेने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.
500 टक्के कर लागणार ?
रशियाने येत्या काही दिवसांमध्ये युक्रेनशी शांतता करार किंवा शस्त्रसंधी केली नाही, तर रशियावर मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले जातील. तसेच रशियाशी व्यापार करणाऱ्या देशांवर 500 टक्के व्यापार शुल्क लागू केले जाईल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप या वृत्ताला अमेरिकेकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. तथापि, भारताने रशियायाकडून इंधन तेल घेणे थांबविले नाही, तर भारतावर अतिरिक्त कर लागू करण्यात येतील, असा इशारा ट्रंप यांनी दोन दिवसांपूर्वी दिला आहे. भारतानेही या इशाऱ्याला आपले प्रत्युत्तर देताना हे धोरण अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. रशियाकडून तेल घेणे थांबविणार नाही, असा संकेत भारताने दिला असून अमेरिकेच्या करवाढीच्या इशाऱ्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.









