अन्य 40 देशांसंबंधीही निर्णय घेतला जाणार, ट्रंप प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्याचा संकेत
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रशासनाने पाकिस्तानसह 41 देशांच्या नागरीकांच्या अमेरिका प्रवेशावर निर्बंध घालण्याच्या योजनेवर विचार करण्यास प्रारंभ केला आहे. हे निर्बंध त्रिस्तरीय असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. या 41 देशांपैकी 11 देशांचा समावेश ‘तांबड्या सूची’त करण्यात येणार आहे.
अमेरिकेचे प्रशासन या 41 देशांची विभागणी तीन रंगांच्या सूचींमध्ये करणार आहे. तांबड्या रंगाच्या सूचीत ज्या देशांचा समावेश असेल त्या देशांच्या नागरीकांच्या अमेरिका प्रवेशावर पूर्णत: निर्बंध लादण्यात येतील. नारिंगी रंगाच्या सूचीत असणाऱ्या देशांच्या नागरीकांवर पूर्णत: नसले तरी कठोर निर्बंध घालण्यात येतील. तसेच पिवळ्या रंगाच्या सूचीतील देशांच्या नागरीकांवर हे निर्बंध काहीसे सौम्य असतील, अशी माहिती देण्यात आली आहे. हे निर्बंध त्वरित लागू होतील.
पाकिस्तान नारिंगी सूचीत
पाकिस्तानचा समावेश दुसऱ्या क्रमांकाच्या नारिंगी सूचीत करण्यात आला आहे. या सूचीत रशिया आणि म्यानमार यांच्यासह 10 देश आहेत. या सूचीतील देशांच्या नागरीकांवर अमेरिका प्रवेशासंबंधीचे निर्बंध कठोर असतील. तथापि, प्रवेश पूर्णत: नाकारण्यात येणार नाही त्यांना अमेरिकेत महत्वाच्या अटींसह केवळ मर्यादित कालावधीसाठी प्रवेश असेल. तसेच त्यांच्यावर सूक्ष्म लक्ष ठेवण्यात येईल. या देशांमधील नागरीकांना मर्यादित कालावधीसाठी अस्थलांतरीत व्हिसा मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा या देशांसाठी धक्का मानला जात आहे.
तांबड्या सूचीसाठी सर्वंकष निर्बंध
अमेरिकेच्या प्रशासनाने 11 देशांसाठी तांबड्या रंगाची सूची सज्ज केली आहे. या सूचीत क्यूबा, इराण, लिबीया, उत्तर कोरिया, सोमालिया, सुदान, सिरीया, व्हेनेझुएला, अफगाणिस्तान आणि भूतान या देशांना स्थान देण्यात आले आहे. या देशांपैकी अफगाणिस्तानचे स्थान निश्चित मानण्यात येत होते. तथापि, भूतान या शांतताप्रिय देशाचाही समावेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पिवळ्या सूचीत वीस देश
पिवळ्या सूचीत कॅरिबियन देश आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा समावेश करण्यात आला आहे. या सूचीतील देशांच्या नागरीकांवर निर्बंध सौम्य पातळीवरचे आहेत. तसेच या देशांना येत्या 60 दिवसांमध्ये सुरक्षाविषयक बाबींसंबंधी अमेरिकेचे समाधान करावे लागणार आहे. या सूचीतील जे देश हे करणार नाहीत, त्यांचा समावेश तांबड्या किंवा नारिंगी सूचीत करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या देशांना त्या दृष्टीने कामाला लागावे लागणार आहे.
निर्बंधांचे कारण काय ?
काही देशांपासून अमेरिकेच्या सुरक्षेला धोका आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी तेथील प्रशासनाला दिली आहे. या देशांमधील नागरीक या ना त्या निमित्ताने आणि अमेरिकेतील प्रवेश कायद्यांमधील त्रुटी हेरुन अमेरिकेत प्रवेश करतात आणि त्या देशाच्या विरोधात कार्य करतात, हे लक्षात आलेले आहे. मागच्या दोन वर्षांमध्ये अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांमध्ये इस्रायलयच्या विरोधात उग्र निदर्शने करण्यात आली होती. अमेरिकेच्या धोरणाच्या विरोधात असणारी ही निदर्शन अशा देशांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती, ही माहिती अमेरिकेच्या प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्यामुळे अशा देशांच्या नागरीकांवर यापुढे कठोर निर्बंध लादले जाणार असून त्यांचा समावेश तांबड्या किंवा नारिंगी सूचीत करण्यात आला आहे, अशी माहिती काही प्रशासकीय सूत्रांनी दिली आहे.
अद्याप अंतिम रुप नाही
या सूचींना अद्याप अंतिम स्वरुप देण्यात आलेले नाही. या 41 देशांपैकी पाकिस्तानचे नागरीक अमेरिकेत सर्वाधिक संख्येने आहेत. या तीन पैकी कोणत्याहवी सूचीत पाकिस्तानचा समावेश झाला, तरी या लोकांसाठी तो मोठा धक्का असेल. कारण सूचींमध्ये समावेश झाल्यास या नागरीकांवर कसोशीने लक्ष ठेवण्याचा अधिकार प्रशासनाला मिळेल, असे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे.
अमेरिकेत प्रवेश कठीण
ड निर्दिष्ट करण्यात आलेल्या 41 देशांच्या नागरीकांना प्रवेश होणार अवघड
ड पाकिस्तानचा समावेश नारिंगी सूचीत केला जाण्याची शक्यता आहे अधिक
ड अमेरिकेच्या सुरक्षेला धोका, वाढती गुन्हेगारी यांच्यामुळे घेतला हा निर्णय
ड सूचींना अंतिम स्वरुप दिल्यानंतर त्यांचे त्वरित क्रियान्वयन होण्याची शक्यता









