ऑपरेशन सिंदूरदरम्यान इराणच्या सीमेनजीक आश्रय : भारतीय क्षेपणास्त्रांची होती धास्ती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरवरून आता मोठा खुलासा झाला आहे. उपग्रहीय छायाचित्रांद्वारे भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करत असताना पाकिस्तानच्या नौदलाने पळ काढला होता असे समोर आले आहे. उपग्रहीय छायाचित्रांमधून भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी नौदलाने कराची येथील स्वत:च्या युद्धनौका हटविण्यासोबत त्यांना कमर्शियल टर्मिनल्समध्ये हलविले होते किंवा इराणच्या सीमेनजीक पाठविले होते असे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत पाकिस्तान भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याची धारणा तयार करू पाहत होता, परंतु उपग्रहीय छायाचित्रांमुळे पाकिस्तानचा पोलखोल झाली आहे.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने स्वत:च्या युद्धनौकांना कराची येथून सुमारे 100 किलोमीटर अंतरावरील ग्वादारच्या दिशेने रवाना केले होते. भारत कराची बंदरावर हल्ला करणार असल्याचे मानून पाकिस्तान भीतीपोटी हे पाऊल उचलत होता. भारताने 1971 मध्ये कराची बंदावर विध्वंसक हल्ले केले होते, यामुळे कराची बंदर अनेक दिवसांपर्यंत पेटत राहिले होते. तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानने काही प्रमुख व्यापारी जहाजांना कराचीच्या कार्गो पोर्टमध्ये उभे केले होते असे उपग्रहीय छायाचित्रांमध्ये दिसून येते.
पाकिस्तानी नौदलाची जुल्फिकार-क्लास फ्रिगेट आणि अन्य युद्धनौका पश्चिमेत ग्वादारमध्ये उभ्या होत्या, हे ठिकाण इराणच्या सीमेपासून केवळ 100 किलोमीटर अंतरावर आहे. 10 मेपर्यंत पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका कराची येथील तळापासून दूर राहिल्या होत्या. पीएनएस अलमगीर, बाबर-क्लास कोरवेट, डेमन ऑफशोर पेट्रोल वेसल या पाकिस्तानी नौदलाच्या युद्धनौका कार्गो जहाजानजीक उभ्या होत्या.
कराचीतून काढला पळ
या छायाचित्रांमुळे पाकिस्तानच्या ‘प्रत्युत्तरादाखल हल्ल्या’च्या कहाणीला पूर्णपणे संपविले आहे. कराची नौदल तळावरून पाकिस्तानच्या सर्व मुख्य युद्धनौका गायब होत्या. त्याऐवजी तीन युद्धनौका एकाचवेळी कराचीच्या कमर्शियल कार्गो पोर्टमध्ये दिसून आल्या, तर आणखी एक जहाज शहराच्या दुसऱ्या कार्गो टर्मिनलमध्ये दिसून आले. यातून भारतीय प्रत्युत्तरादाखल कारवाईने घाबरून जात पाकिस्तानने स्वत:च्या युद्धनौकांना सुरक्षितठिकाणी हलविले होते असे स्पष्ट संकेत मिळतात. युद्ध वाढल्यास भारतीय नौदल कराची बंदर पूर्णपणे नष्ट करेल अशी भीती पाकिस्तानला होती. भारताने अरबी समुद्राला पूर्णपणे ब्लॉक केले होते. भारताची विमानवाहू युद्धनौका स्वत:च्या पूर्ण ताफ्यासह पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी सज्ज होती. परंतु भारतीय नौदलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये थेट भाग घेतला नाही.
भारतीय नौदल अधिक सामर्थ्यशाली
6-7 मेच्या रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी अ•dयांवर हल्ले केले होते. तर ही उपग्रहीय छायाचित्रे 8 मे रोजीची आहेत. पाकिस्तानच्या प्रमुख युद्धनौका स्वत:च्या निर्धारित नौदल तळावरुन गायब होत्या. त्याऐवजी या युद्धनौकांनी कराचीच्या वाणिज्यिक कार्गो बंदरावर आश्रय घेतल होता, असे उपग्रहीय छायाचित्रांमधून स्पष्ट झाले आहे. यातून भारताच्या नौदलाकडून कारवाई होण्याची भीती पाकिस्तानला सतावत होती हे समोर आले आहे.









