सागरी सीमेत शिरले होते पीएनएस आलमगीर ः तटरक्षक दलाच्या इशाऱयानंतर परतली युद्धनौका
वृत्तसंस्था / गांधीनगर
पाकिस्तानच्या युद्धनौकेने मागील महिन्यात भारतीय सागरी सीमेत घुसखोरी केली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या डोर्नियर टेहळणी विमानाने या युद्धनौकेला पिटाळून लावले. पाकिस्तानी नौदलाचे पीएनएस आलमगीर गुजरातनजीकच्या भारतीय सागरी सीमेत दाखल झाले होते. ही घटना समजताच सागरी सीमेची देखरेख करणाऱया डोर्नियर विमानाने या युद्धनौकेला भारतीय सीमेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता.
इशाऱयानंतरही पाकिस्तानी युद्धनौकेने कुठलाच प्रतिसाद न दिल्याने डॉर्नियरने तिला पिटाळून लावले आहे. परंतु याप्रकरणी तटरक्षक दलाकडून कुठलेच वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. पण, कठोर कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तानी युद्धनौका भारतीय सागरी सीमेतून बाहेर पडल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
रेडिओ संदेशांवर नव्हता प्रतिसाद
पाकिस्तानी युद्धनौका आलमगीर भारतीय सीमेत शिरताच डोर्नियर टेहळणी विमानाने त्याचा शोध लावला होता. डोर्नियर विमानाद्वारे आलमगीरला परतण्याचा इशारा देण्यात आला, परंतु कुठलाच प्रतिसाद मिळाला नव्हता. डोर्नियरने पाकिस्तानी युद्धनौकेचा उद्देश जाणून घेण्यासटी रेडिओ संचार सेटवर कॉल देखील केला, परंतु पाकिस्तानी युद्धनौकेच्या कॅप्टनने प्रतिसाद देण्याऐवजी मौन बाळगले होते.

डोर्नियरचे आक्रमक उड्डाण
पाकिस्तानी युद्धनौकेच्या हालचाली संशयास्पद वाटल्यावर डोर्नियरने त्याच्या समोर दोन ते तीनवेळा ऍग्रेसिव्ह फॉर्मेशनमध्ये उड्डाण केले. यामुळे डोर्नियर विमानाने आक्रमक भूमिका घेतल्याचे पाकिस्तानी युद्धनौकेच्या कॅप्टनला कळले आणि त्यांनी भारतीय सीमेतून परतण्याचे पाऊल उचलले. त्यानंतर डोर्नियर विमानाने दूर अंतरापर्यंत पाकिस्तानी युद्धनौकेवर नजर ठेवली होती.
अमेरिकेने दिली होती युद्धनौका
पाकिस्तानी नौदलाने आतापर्यंत स्वतःच्या तीन युद्धनौकांना आलमगीर हे नाव दिले आहे. विद्यमान आलमगीर युद्धनौका 2010 मध्ये अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळाली होती. 4100 टन वजनाची 453 फूट लांबीची ही युद्धनौका आहे. 100 सेकंदांमध्ये 30 नॉट्सहून अधिक वेग ही युद्धनौका गाठू शकते. या युद्धनौकेवर दोन हेलिकॉप्टर्स तैनात केली जाऊ शकतात.
तटरक्षक दलप्रमुखांचा दौरा
भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक व्ही.एस. पठानिया यांनी काही दिवसांपूवीं पोरबंदर क्षेत्राचा दौरा केला होता. यादरम्यान त्यांनी किनारी भागाच्या देखरेखीसाठी तटरक्षक दलात ध्रूव हेलिकॉप्टर्सचा समावेश केला होता. विमाने तसेच हेलिकॉप्टर्ससह तटरक्षक दलाच्या अनेक नौका दिवसरात्र किनारी क्षेत्रावर नजर ठेवून आहेत.









