पश्तून भागावर असणार टीटीपीचे राज्य : शरियाद्वारे चालणार शासन
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
पाकिस्तानचे सैन्य पेशावरच्या सैनिकशाळेत शेकडो मुलांचा जीव घेणारी दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) समोर आत्मसमर्पण करणार आहे. तालिबानच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपी यांच्यात शस्त्रसंधी झाली असून लवकरच एका करारावर स्वाक्षरी होणार आहे. याच्या अंतर्गत पाकिस्तानी सैन्य मोठय़ा संख्येत टीटीपी दहशतवाद्यांची मुक्तता करणार आहे. तसेच आदिवासी भागात हजारेंच्या संख्येत तैनात पाकिस्तानी सैनिक हटविले जाणार आहेत. याचबरोबर खैबर पख्तूनख्वा प्रांताच्या मलकंद भागात शरीया कायदा लागू केला जाणार आहे.
पाकिस्तानच्या आदिवासी भागातच पहिल्यांदा 2007 मध्ये टीटीपीची स्थापना झाली होती. परंतु आदिवासी भागाचे खैबर पख्तूनख्वामध्ये विलिनीकरण केले जाणार की नाही याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. याचबरोबर टीटीपी दहशतवाद्यांना त्यांची शस्त्रास्त्रs परत करण्यासंबंधी आणि दहशतवादी संघटना सक्रीय राहणार की नाही याचाही निर्णय झालेला नाही. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल बाजवा आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हजारोंच्या संख्येत टीटीपी दहशतवाद्यांची मुक्तता आणि त्यांच्या विरोधातील खटले मागे घेण्यावर सहमती दर्शविली आहे.
टीटीपीसोबतच्या कराराला विरोध
पाकिस्तान सरकारने टीटीपीसमोर शरणागती पत्करल्याने पेशावर शाळेत मारले गेलेल्या मुलांच्या आईवडिलांना स्वतःची फसवणूक झाल्याचे वाटत असून ते नाराज आहेत. पेशावर आर्मी पब्लिक स्कुलवर 2014 साली झालेल्या हल्ल्यात 132 हून अधिक मुलांना जीव गमवावा लागला होता. ही सर्व मुले पाकिस्तानी सैनिकांची होती. टीटीपीसोबत करार करून आमच्या जखमांवर मीठ चोळले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर पाकिस्तानी अधिकाऱयांनी 14 वर्षांपासून सुरू असलेला उग्रवाद संपुष्टात आणण्याची इच्छा असल्याचा युक्तिवाद केला आहे.
पश्तूनांना सतावेत भीती पाकिस्तान सैन्याने इस्लामिक तालिबानला मदत करत अफगाणिस्तानच्या राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न चालविला आहे. तसेच पश्तून भागाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न आहे. पश्तून भाग दोन्ही देशांमध्ये आहे. पश्तून हा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील सर्वात मोठा जातीय अल्पसंख्याक समूह आहे. या समुदायाची लोकसंख्या सुमारे 4 कोटी आहे. टीटीपीसोबत 2008 आणि 2009 साली करार झाला होता. परंतु टीटीपीने याचे पालन न केल्याने पाकिस्तानच्या सैन्याला स्वात खोऱयात मोहीम राबवावी लागली होती. स्वात खोरे मलकंद भागातील 7 जिल्हय़ांपैकी एक आहे. आता पश्तूनांना टीटीपीच्या क्रूर राजवटीची भीती सतावू लागली आहे.









