अमेरिकेवर हल्ल्याचे कारस्थान असफल
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
पाकिस्तानचा दहशतवादी मोहम्मद शहाझेब खान याने रचलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ज्यू लोकांच्या वस्त्यांवर दहशतवादी हल्ले करण्याच्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. हे कारस्थान त्याने आणि त्याच्या गटाने कॅनडामध्ये शिजवले होते. याची माहिती कळताच त्याला अटक करण्यात आली आणि त्याचे अमेरिकेला प्रत्यार्पण करण्यात आले. ही माहिती कॅनडाच्या प्रशासनाने दिली आहे.
अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेने हे कारस्थान उघडकीस आणले आहे. एफबीआयचे प्रमुख काश्यप पटेल यांनी या कारस्थानाची व्यापकता उघड केली. शहाझेब खान याने काही आठवड्यांपूर्वी कॅनडातून अमेरिकेत बेकायदा घुसण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तो हाणून पाडण्यात आला. अमेरिकेत घुसून न्यूयॉर्कमधील ज्यू सांस्कृतिक केंद्रे आणि ज्यू वस्त्या यांच्यावर हल्ले करण्याची त्याची योजना होती. या हल्ल्यांमध्ये त्याला आयएसआयएस या इस्लामी दहशतवादी संघटनेचे साहाय्य होणार होते. स्वत: शहाझेब खान हा आयएसआयएसचा सक्रीय हस्तक आहे. हे कारस्थान रचण्यासाठी त्याने ‘एन्क्रिप्टेड मेसेजिंग’ अॅप्सचा उपयोग करुन जाळे विणले होते. अशा अॅप्सवरुन तो या कटात सहभागी असलेल्या अन्य हस्तकांशी संपर्क करीत असे. तथापि, एफबीआयने हे अॅप्स डीकोड करुन त्याच्या कारस्थानांचा पर्दाफाश केला आहे.
अभियोग चालणार
या कारस्थानाची माहिती अमेरिकेकडून कॅनडाला देण्यात आल्यानंतर कॅनडाने त्याचे प्रत्यार्पण अमेरिकेला केले आहे. त्यामुळे आता या कारस्थानाची पाळेमुळे खणून काढण्याची संधी अमेरिकेला मिळणार आहे. सध्या त्याची चौकशी केली जात असून लवकरच त्याच्यावर अभियोग चालणार आहे.
सर्वात मोठा हल्ला ठरला असता…
आपले कारस्थान यशस्वी झाले, तर हा हल्ला अमेरिकेतील सर्वात भीषण दहशतवादी हल्ला ठरेल, असा संदेश त्याने गुप्त मेसेजिंग अॅप्सवरून आपल्या इतर दहशतवादी सहकाऱ्यांना पाठविला होता, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता त्याचा गट उद्ध्वस्त करण्यासाठी एफबीआय ही संस्था सज्ज झाली आहे.









