ओळख बदलून नोकरी करत होता पाकिस्तानी नागरिक
वृत्तसंस्था/सोल
पाकिस्तान पूर्ण जगात दहशतवादाचा सर्वात मोठा निर्यातदार ठरला आहे. भारत दशकांपासून पाकिस्तानकडून पोसल्या जाणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात लढत आहे. परंतु आता पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियापर्यंत पोहोचले आहेत. दक्षिण कोरियाच्या पोलिसांनी राजधानी सोलच्या इटावोन जिल्ह्यात एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. हा पाकिस्तानी नागरिक लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा सदस्य आहे. हा दहशतवादी स्वत:ची ओळख बदलून स्थानिक बाजारातील एका दुकानात काम करत होता. ग्योंगगी नम्बू प्रांतीय पोलीस एजेन्सीच्या अधिकाऱ्यांनी 40 वर्षीय संशयिताला दहशतवाद विरोधी अधिनियम आणि इमिग्रेशन अधिनियमाच्या उल्लंघनाप्रकरणी अटक केली आहे.
संशयित पाकिस्तानात 2020 साली लष्कर-ए-तोयबात सामील झाला होता, तसेच त्याने शस्त्रास्त्रांचा वापर आणि घुसखोरी करण्याचे प्रशिक्षण मिळविले होते. पाकिस्तानातील दक्षिण कोरियन वाणिज्य दूतावासाकडून प्राप्त व्हिसाचा वापर करत तो डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण कोरियात दाखल झाला होता. कथित स्वरुपात तो एक व्यावसायिक म्हणून दक्षिण कोरियात आला होता. दक्षिण कोरियात या संशयितावर कुठल्याही दहशतवादी कृत्याचा कट रचण्याचा आरोप नाही. परंतु लष्कर-ए-तोयबाशी त्याचे कनेक्शन हे दहशतवादविरोधी अधिनियमाच्या कलम 17 चे उल्लंघन करणारे आहे. तर कथित स्वरुपात संशयिताने हे आरोप फेटाळले आहेत. लष्कर-ए-तोयबासाठी पैसे त्याने पाठविले आहेत का याचा तपास आता पोलीस करत आहेत. कोरियाच्या पोलिसांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेकडून घोषित करण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या एखाद्या सदस्याला पकडण्याची ही पहिलीच वेळ आहे.









