‘युएन’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून निराधार आरोप
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन डीसी
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत (युएन) भाषण देताना यावर्षी भारताशी झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने 7 भारतीय लढाऊ विमाने पाडल्याचा खोटा दावा केला. तसेच शाहबाज शरीफ यांनी त्यांच्या वैमानिकांचे कौतुक करताना त्यांना ‘योद्धे’ असे संबोधले. आमच्या योद्ध्यांनी भारताची सात लढाऊ विमाने पाडली असे त्यांनी सांगितले. यावर भारताने हे दावे निराधार आणि पुराव्यारहित असल्याचे म्हटले आहे.
80 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला टार्गेट केले. त्यांनी पाकिस्तानला साळसूद ठरवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राजकीय फायदा घेतल्याचा भारतावर खोटा आरोप केला. तसेच शरीफ यांनी ट्रम्प यांचे ‘शांततेचे पुरस्कर्ते’ म्हणून कौतुक केले. ट्रम्प यांच्या प्रयत्नांमुळे भारत-पाकिस्तान युद्धबंदी शक्य झाली असे सांगण्यात आले. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानने केलेली विधाने त्यांची हताशता स्पष्टपणे दर्शवते.
मे 2025 मध्ये भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानवर हल्ला केला. 7 मे रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई सुरू करण्यात आली. भारताने या घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी केला, असा शरीफ यांचा आरोप आहे. भारताच्या प्रत्युत्तरात्मक हवाई आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) येथील नऊ ठिकाणांवर लक्ष्य करण्यात आले. यात केवळ दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य बनवण्यात आले. कोणत्याही ठिकाणी सर्वसामान्य नागरिक आणि लष्करी सैनिकांवर हल्ला करण्यात आला नाही. या संघर्षादरम्यान पाकिस्तानचे डीजीएमओ यांनी भारतीय समकक्षांशी संपर्क साधल्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली. याचदरम्यान शरीफ आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. सहा वर्षांत पाकिस्तानी पंतप्रधानांचा हा पहिलाच अमेरिका दौरा होता.









