दौऱ्यावेळी सोबत असणार सैन्यप्रमुख असीम मुनीर
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
चालू महिन्याच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत महत्त्वाची बैठक होणार असून यात जगभरातील नेते सहभागी होणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ देखील या महासभेत भाग घेण्यासाठी अमेरिकेत पोहोचतील. यादरम्यान ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात.
पाकिस्तानचे पंतप्रधान 25 सप्टेंबर रोजी ट्रम्प यांची भेट घेणार असल्याचे समजते. महासभेच्या व्यतिरिक्त ही बैठक होणार आहे. यादरम्यान पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. या बैठकीदरम्यान पाकिस्तानातील पूरापासून कतारवरील इस्रायलच्या हल्ल्याच्या प्रभावावर चर्चा होणार आहे.
भारत-पाकिस्तामधील संघर्ष रोखण्याचे श्रेय भारताने न दिल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज असल्याचे मानले जाते. तर पाकिस्तानचे सैन्यप्रमुख असीम मुनीर यांनी भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचे श्रेय डोनाल्ड ट्रम्प यांचे असल्याचे वक्तव्य करत त्यांना खूश केले होते. यानंतर मुनीर यांना व्हाइट हाउसमध्ये डिनरसाठी ट्रम्प यांनी निमंत्रित पेले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ महासभेच्या बैठकीत भाग घेणार नाहीत. त्यांच्या जागी विदेशमंत्री एस. जयशंकर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ महासभेचे 80 वे सत्र 9 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. उच्चस्तरीय बैठक 23-29 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या बैठकीत पहिला वक्ता ब्राझील असेल, तर त्यानंतर अमेरिका महासभेला संबोधित करणार आहे.
भारताच्या वतीने विदेशमंत्री जयशंकर हे 27 सप्टेंबर रोजी महासभा सत्राला संबोधित करणार आहेत. परंतु यापूर्वी जुलै महिन्यात जारी करण्यात आलेल्या वक्त्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव सामील होते. त्या यादीनुसार पंतप्रधान मोदी हे 26 सप्टेंबर रोजी महासभा सत्राला संबोधित करणार होते, परंतु वक्त्यांच्या यादीत यापुढेही बदल होण्याची शक्यता आहे.









