राजस्थानसह तीन राज्यात तासभर उड्डाण : खराब हवामानाचा फटका
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तानी विमान भारतीय हद्दीत घुसल्याचे प्रकरण समोर आले आहे. हे विमान 1 तासाहून अधिक काळ भारतीय हवाई क्षेत्रात उडत राहिले. खराब हवामानामुळे राजस्थानसह तीन राज्यांच्या भारतीय हवाई हद्दीत पाकिस्तानी विमान उडत राहिल्याचा प्रकार उघड झाला आहे. अलीकडेच खराब हवामानामुळे भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचल्याचा प्रकार दोनवेळा घडला होता. खराब हवामानामुळे नागरी विमाने अशाप्रकारे भरकटल्यास त्यांना सुरक्षित रस्ताही दिला जातो.
पाकिस्तानी प्रवासी विमानाने कराचीहून इस्लामाबादला उड्डाण केल्यानंतर ते भारतीय हद्दीत आल्याचे उघड झाले आहे. विमानाने उड्डाण करताच काही मिनिटांतच हवामान खराब झाल्यामुळे विमान अपेक्षित मार्गापासून दूर पोहोचले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास भारतीय हवाई हद्दीत आलेले हे विमान संध्याकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचले. पाकिस्तानातून भरकटलेले हे विमान सुरुवातीला राजस्थानच्या हद्दीत घुसले होते. त्यानंतर हरियाणा आणि पंजाबमधून जात सुमारे 1 तास 12 मिनिटे भारतीय हवाई क्षेत्रात फिरत राहिले. पाकिस्तानच्या या नागरी विमानाच्या भरकटण्यासंबंधी भारतीय हवाई दल आणि हवाई प्राधिकरणांना आधीच माहिती मिळाली होती.
सिंध आणि पंजाबच्या भागात हवामान दमट झाल्यामुळे पाकिस्तानच्या विमानाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. पाकिस्तानातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अशा वातावरणात अशा घटना सहसा पाहायला मिळतात. भारतीय विमानांच्या बाबतीतही असेच घडते. जून महिन्याच्या सुरुवातीला खराब हवामानामुळे एक भारतीय विमानही भरकटले होते. अहमदाबादहून अमृतसरला उड्डाण करणारे विमान सुमारे अर्धा तास पाकिस्तानच्या हद्दीत घुसले होते.









