तेहरीक ए तालिबानने केला एन्काऊंटरमध्ये खात्मा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2019 मध्ये भारताने पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर केलेल्या वायुहल्ल्याच्या काळात भारताच्या अभिनंदन वर्धमान या विमानचालकाला पकडण्याचा दावा केलेला पाकिस्तानचा सेनाधिकारी पश्चिम पाकिस्तानातील वझीरीस्थान या भागात ठार झाला आहे. पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा या स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या तेहरीक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या बंडखोरांच्या एन्काऊंटरमध्ये तो मारला गेला. मोईझ अब्बास शहा असे त्याचे नाव आहे. पाकिस्तानने त्याच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
या बंडखोर संघटनेच्या एका तुकडीने बुधवारी पश्चिम वझीरीस्थानच्या सरगोधा भागात पाकिस्तानच्या सैनिकांच्या तुकडीवर हल्ला केला होता. शहा सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करीत होता. या एन्काऊंटरमध्ये त्याला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे 14 सैनिक आणि अधिकारी मारले गेले आहेत. हा पाकिस्तानसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
स्वत:च्याच औषधाची चव
भारतात दहशतवादी पाठवून येथे हिंसाचार माजविण्याचा प्रयत्न सातत्याने करणाऱ्या पाकिस्तानला आता त्याच्याच घरात बंडखोरांनी सतावले आहे. खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्थान या दोन पश्चिमेकडील प्रांतांमध्ये पाकिस्तानच्या सरकारच्या विरोधात प्रचंड संघर्ष होत आहे. बलुचिस्थानने तर स्वत:चे स्वातंत्र्यच घोषित केले आहे. या भागात पाकिस्तानच्या सरकारविरोधात बंड करणाऱ्या अनेक संघटना कार्यरत आहेत. त्यांच्यातील काही संघटना स्वत:ला स्वातंत्र्यसेना म्हणवून घेतात. त्यांच्यावर नियंत्रण आणणे हे पाकिस्तानला अत्यंत कठीण जात आहे. या दोन प्रांतांच्या अनेक भागांवर बंडखोरांचेच वर्चस्व असून पाकिस्तानची या भागातील सत्ता उलथविण्याचा त्यांचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. त्यामुळे भारतात हिंसाचार माजविण्यात आनंद मानणाऱ्या पाकिस्तानला त्याच्या घरातच असाच अनुभव आता येत आहे. 24 जूनपासून पाकिस्तानी लष्कराने या भागात बंडखोरांना नेस्तनाबूत करण्यासाठी कारवाईचा प्रारंभ केला होता. तथापि, या कारवाईत पाकिस्तानचीच हानी अधिक झाल्याचे वृत्त आहे.









