वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाह खालिदचा बचाव केला आहे. भारताने कुठल्याही चौकशीशिवाय सैफुल्लाहला पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार ठरविले. भारतीय अधिकाऱ्यांनी हल्ल्यानंतर काही दिवसातच सैफुल्लाह विरोधात एफआयआर नोंदविला, परंतु भारताकडे या आरोपाप्रकरणी कुठलाच पुरावा नसल्याचा दावा मलिक अहमद खान यांनी केला आहे. याचबरोबर भारतात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच जबाबदार असल्याचा कांगावा मलिक यांनी केला आहे.
पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 28 मे रोजी एका कार्यक्रमादरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी आणि राजकीय नेते एकाच व्यासपीठावर दिसुन आले होते. या कार्यक्रमात पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाह कसूरी, लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक आमिर हमजा आणि हाफिज सईदचा पुत्र तल्हा सईद देखील उपस्थित होता. या दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानचे अन्नसुरक्षा मंत्री मलिक राशिद अहमद खान आणि पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक मुहम्मद अहमद खान दिसून आले. या कार्यक्रमात राजकीय नेते आणि दहशतवाद्यांनी भारताच्या विरोधात प्रक्षोभक भाषणं केली होती. सैफुल्लाह हा पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील रावलकोटचा रहिवासी आहे. पीओके मधूनच तो भारत विरोधात दहशतवादी कारवाया घडवून आणत होता.









