चौकशीत घेतले अभिनेत्री अवनीतचे नाव
वृत्तसंस्था/ जम्मू
बीएसएफने जम्मूच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एक पाकिस्तानी घुसखोराला पकडले आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या सरगोधा येथील रहिवासी असलेल्या या घुसखोराचे नाव सिराज खान आहे. बीएसएफकडून झालेल्या प्रारंभिक चौकशीत सिराज हा पंजाबी अभिनेत्री अवनीत कौरला भेटण्यासाठी भारतात शिरला होता असे समजले आहे. परंतु सध्या बीएसएफसह अन्य यंत्रणा त्याची कसून चौकशी करत आहेत.
सिराजला रविवारी रात्री 9.20 वाजता ऑक्ट्रोई चौकीवर तैनात बीएसएफच्या जवानांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला सीमेच्या कुंपणानजीक अटक करण्यात आली. सिराजकडून काही पाकिस्तानी चलनी नोटा हस्तगत झाल्या आहेत. सध्या त्याने भारतीय सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न कशासाठी केला हे जाणून घेण्यासाठी चौकशी करण्यात आहे.
सिराज जम्मूच्या सुचेतगढ तालुक्यातील सीमेच्या कुंपणाच्या दिशेने आक्रमक स्वरुपात पुढे सरकत होता. सतर्क जवानांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले, अशास्थितीत धोका ओळखून बीएसएफच्या जवानांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला, मग जवानांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर केलेल्या चौकशीदरम्यान त्याने स्वत:चे नाव सिराज खान असल्याचे आणि आपण पाकिस्तानच्या सरगोधा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले होते. पंजाबी अभिनेत्री अवनीत कौरची भेट घेण्यासाठी आपण भारतात शिरल्याचा दावा त्याने केला, असे बीएसएफकडून सांगण्यात आले.









