आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना बीएसएफची कारवाई
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय सीमेत घुसणाऱ्या एका पाकिस्तानी घुसखोराचा बीएसएफच्या जवानांनी खात्मा केला आहे. ही घटना 23 मे च्या मध्यरात्री घडली. सुरक्षा दलाने शनिवारी सकाळी ही माहिती दिली. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यात जवानांना एक संशयास्पद व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना दिसली. बीएसएफ जवानांनी त्याला थांबण्याची सूचना केली असतानाही तो थांबला नसल्यामुळे गोळ्या झाडण्यात आल्या. या गोळीबारात सदर घुसखोर ठार झाल्याचे बीएसएफने सांगितले. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव कमी होत असल्याचे दिसून येत असले तरी भारतीय सैन्य अजूनही सतर्क आहे.
याचदरम्यान बीएसएफने गुजरात-पाकिस्तान सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. नादाबेट-सुईगाम सीमेजवळ रात्रीचा फायदा घेऊन घुसखोरीचा प्रयत्न झाला, परंतु आमच्या सतर्क सैनिकांनी संशयिताला कंठस्नान घातल्याचे बीएसएफने स्पष्ट केले आहे. घुसखोराचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी वाव रेफरल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आला. याप्रसंगी स्थानिक पोलीस बीएसएफसह वाव रेफरल हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मृत घुसखोराकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सापडलेली नाहीत. गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेवर बऱ्याच काळानंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला असल्याने बीएसएफ या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहे.









