वृत्तसंस्था/ चंदीगड
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 155 व्या बटालियनच्या सतर्क जवानांनी भारतीय सीमेत घुसखोरी करताना एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले. त्याच्याकडून पाकिस्तानी चलनही जप्त करण्यात आले आहे. ही घटना फिरोजपूर जिह्यातील केएमएस वाला येथील बॉर्डर आउट पोस्टजवळ (बीओपी) घडली. सदर घुसखोर भारतीय हद्दीत घुसला होता. बीएसएफने त्याला इशारा देऊन थांबवले होते. आता बीएसएफचे अधिकारी सदर नागरिकाची चौकशी करण्यात व्यग्र आहेत.
गुप्तचर सूत्रांनुसार, बीएसएफने सीमा स्तंभ क्रमांक-190/4 जवळ भारतीय सीमेत प्रवेश करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले आहे. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव मुजम्मिल मोहम्मद हुसेन (रहिवासी गाव मियाँचानु हुसेनाबाद, जिल्हा खानेवाल – पाकिस्तान) असे सांगितले.









