वृत्तसंस्था / क्वेट्टा
पाकिस्तानच्या काही तरुण फुटबॉलपटूंचे दहशतवाद्यांकडून अपहरण करण्यात आले आहे. ते सध्या काही स्थानिक फुटीरतावादी दहशतवाद्यांच्या ताब्यात असून त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न पाकिस्तानी सरकार करीत आहे. हे सर्व खेळाडू 17 ते 20 या वयोगटातील आहेत, अशी माहिती देण्यात आली.
त्यांचे अपहरण गेल्या शनिवारी करण्यात आले. पाकिस्तानच्या सरहद्द प्रांतातील सुयी या गावातून त्यांना पळविण्यात आले. तेव्हापासून या खेळाडूंचा त्यांच्या कुटुंबियांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यामुळे ते चिंतेत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. अपहरण झालेल्या फुटबॉलपटूंपैकी अनेक जण राष्ट्रीय संघात समाविष्ट होण्याची क्षमता असणारे आहेत. त्यांना पळविणारे दहशतवादी बलुची असावेत असे अनुमानही व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी काही दहशतवादी पाकिस्तानी पोलिसांना शरण आले होते. अपहरण झालेले खेळाडू या शरण आलेल्या दहशतवाद्यांशी संबंधित असावेत अशीही चर्चा आहे.









