दिवसभर शस्त्रास्त्रे-अमली पदार्थांचा शोध
गुरुदासपूर / वृत्तसंस्था
पंजाबमधील अजनाला येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफच्या जवानांनी शुक्रवारी पहाटे पाकिस्तानचे ड्रोन पाडले. ही घटना शाहपूर बॉर्डर आऊट पोस्टवर घडली. गुरुदासपूरमध्ये तैनात 73 व्या बटालियनच्या जवानांनी गोळीबार करून ड्रोन पाडण्यात यश मिळविले. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले अधिकारी ड्रोनची तपासणी करत आहेत. तसेच संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविण्यात येत असून शस्त्रास्त्र किंवा अमली पदार्थ तस्करीचा शोध घेण्याचा प्रयत्न दिवसभर सुरू होता, असे डीआयजी प्रभाकर जोशी यांनी सांगितले.
शाहपूर येथे पहाटे सीमेवर तैनात असलेल्या जवानांना एक ड्रोन भारतीय हद्दीत घुसल्याचे दिसले. तत्काळ कारवाई करत जवानांनी ड्रोनवर 17 गोळय़ा झाडल्या. कंपनी कमांडर राकेश आणि इन्स्पेक्टर कमलेश यांना आकाशातून एक वस्तू खाली येताना दिसली. सदर वस्तू पाकिस्तानी ड्रोन असल्याची खात्री झाल्यानंतर गोळीबार करून ते पाडण्यात आले. त्यानंतर सकाळपासून संबंधित परिसरात शोधकार्य राबविण्यात आले. येथे जंगल आणि पाणी असल्यामुळे मोहिमेला यश मिळाले नव्हते. पण, पाडलेले ड्रोन तपास पथकाच्या हाती सापडले आहे. गोळीबारामुळे ड्रोनच्या एका ब्लेडचे नुकसान झाले. पाडण्यात आलेला ड्रोन चिनी बनावटीचा असून तो 10 किलो वजन घेऊन उडू शकतो.
यापूर्वी 4 ऑक्टोबरला गुरुदासपूर सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्रोन निदर्शनास आले होते. सीमेपलीकडून शस्त्रे आणि अमली पदार्थ ड्रोनद्वारे भारतात पाठविण्याचा पाकिस्तानी तस्कर प्रयत्न करत असतात.









