अमृतसर / वृत्तसंस्था
अमली पदार्थांच्या पिशव्या घेऊन येणारे पाकिस्तानी ड्रोन पंजाबमध्ये पाडण्यात आले आहे. सीमा सुरक्षा दलाने ही कामगिरी केली आहे. अमृतसर या सीमावर्ती शहरात सीमेजवळील एका चौकपासून काही अंतरावर हे ड्रोन पकडण्यात आले. रविवारी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी हे ड्रोन भारताच्या वायुकक्षेत दिसून आले. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. ते पडल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. त्यातील अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
हे ड्रोन चिनी बनावटीचे होते. अशा प्रकारची तीन ड्रोन्स गेल्या आठवडय़ात पाडण्यात आली आहेत. ड्रोन्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी करण्याचे डावपेच पाकिस्तानने गेल्या वर्षभरापासून सुरु केले आहेत. याकामी पाकिस्तानाला चीनचेही सहकार्य असल्याचे दिसून आले आहे. मात्र भारतानेही असे ड्रोन्स पाडविण्यासाठी किंवा निष्प्रभ करण्यासाठी यंत्रणा संस्थापित करण्यासाठी पावले उचलली असून आता ती प्रभावी ठरताना दिसतात, असे तज्ञांचे मत आहे.









