वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला उघडपणे धमकी दिली आहे. पाकिस्तान हा अल्लाहच्या नावाने निर्माण झालेला देश आहे. आमचे रक्षक अल्लाहचे सैनिक आहेत. सद्यस्थितीत युद्ध झाले तर भारत पाकिस्तानच्या आक्रमणात लढाऊ विमानांच्या ढिगाऱ्याखाली गाडला जाईल, अशी खालच्या पातळीवरील टीका त्यांनी रविवारी सोशल मीडिया ‘एक्स’द्वारे केली. तसेच भारतीय नेतृत्व त्यांची गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यासाठी भडकाऊ विधाने करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. देशांतर्गत आव्हानांवरून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नवी दिल्ली जाणूनबुजून तणाव वाढवत असल्याचा आरोपही आसिफ यांनी केला. यापूर्वी शनिवारी रात्री ‘जर आता दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले तर ते विनाशकारी ठरेल. जर शत्रुत्वाचा एक नवीन टप्पा सुरू झाला तर पाकिस्तान मागे हटणार नाही. आम्ही संकोच न करता प्रत्युत्तर देऊ,’ असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले होते.









