श्रीनगर :
राजौरी पोलीस स्टेशन आणि चिंग्स पोलीस चौकी अंतर्गत पिंड नरिया गावात बुधवारी हँडग्रेनेडसह काही फाटलेल्या पाकिस्तानी नोटा सापडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, पिंड नारिया येथे काही मुले जनावरे चारण्यासाठी गेली असता त्यांना झुडपात ग्रेनेड निदर्शनास आली. त्यांनी लगेच गावातील एका माजी सैनिकाला माहिती दिली. माजी सैनिकाने यासंबंधी लष्कराला माहिती दिल्यानंतर सुरक्षा दलाने कोणताही वेळ न दवडता सदर भागातून हँडग्रेनेड जप्त केली. याप्रसंगी बॉम्बनिकामी आणि श्वानपथकही घटनास्थळी नेण्यात आले होते. ग्रेनेड सापडलेल्या ठिकाणाजवळ लष्कराला पाकिस्तानच्या फाटलेल्या नोटाही सापडल्या आहेत. याबाबत कोणत्याही पोलीस किंवा लष्करी अधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिलेली नाही.