वृत्तसंस्था/ कराची
विदेशामध्ये टी-20 लिग स्पर्धा मोठ्या प्रमाणात खेळविल्या जात आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लिग तर भारतामध्ये आयपीएल स्पर्धा क्रिकेट क्षेत्रात गाजत आहेत. दरम्यान पाकच्या बऱ्याच क्रिकेटपटूंना अद्याप विदेशी लिग स्पर्धांमध्ये खेळण्यास एनओसी देण्यास विलंब केला जात असल्याने पीसीबीचे निवड समिती प्रमुख वहाब रियाज यांच्यावर पाक क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली आहे.
पाकचा अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वासिमने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पूर्णविराम देण्याचे ठरविले आहे. लिग स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी पीसीबीचे वहाब रियाज यांच्याकडून अधिक उशिर होत असल्याने पाकच्या बऱ्याच क्रिकेटपटूंनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अलिकडेच पीसीबीने बऱ्याच पाक क्रिकेटपटूंबरोबर मध्यवर्ती करार केला आहे. या करारानुसार पीसीबीने अट घातली आहे. करारबद्ध झालेल्या पाक क्रिकेटपटूंना देशासाठी खेळण्यास पहिले प्राधान्य देण्यात आले आहे. संयुक्त अरब अमीरातमध्ये टी-10 आणि टी-20 लीग स्पर्धांसाठी इमाद वासिमकडे अनेक संघांनी कराराची मानसिकता दाखवली आहे. अबुधाबीमध्ये होणाऱ्या आगामी टी-10 लीग स्पर्धेसाठी इमाद वासिमची दखल म्हणावी तशी घेतली जात नसल्याने वासिमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार केला आहे.









