वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूरचा चित्रपट ‘अबीर गुलाल’ संकटात सापडला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या चित्रपटाला रोखण्याची मागणी करण्यात आली होती. तर आता माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सूत्रांनुसार अबीर गुलाल हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. वर्तमान राजनयिक आणि सुरक्षा वातावरण पाहता या चित्रपटाला प्रदर्शित करण्याची अनुमती दिली जाणार नसल्याचे समजते. सरकार कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराशी निगडित सामग्रीला भारतात प्रसारित किंवा प्रदर्शित करू इच्छित नाही. तसेच चित्रपटगृह चालकांनी देखील हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचे वृत्त ऐकून दु:ख झाले. या घटनेच्या पीडितांसोबत आमच्या संवेदना आहेत. आम्ही या संकटसमयी त्यांच्या परिवारांना शक्ती देण्यासाठी प्रार्थना करू असे फवाद खानने म्हटले होते. आरती एस. यांच्याकडून दिग्दर्शित अबीर गुलाल हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित केला जाणार होता, तर या चित्रपटाद्वारे फवाद हा 9 वर्षांनी बॉलिवुडमध्ये पुनरागमन करणार होता. या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण विदेशात झाले आहे.









