विदेशमंत्री जयशंकर यांनी केले लक्ष्य : अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा ठरविला चुकीचा
वृत्तसंस्था/अॅमस्टरडॅम
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांना धर्मांध ठरविले आहे. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर यांचे विचार आणि वर्तनात धार्मिक कट्टरता स्पष्टपणे दिसून येत असल्याचे जयशंकर यांनी नेदरलँड येथील प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले. जयशंकर यांनी यावेळी मुनीर यांच्या भाषणाचाही उल्लेख केला. यात मुनीर यांनी काश्मीरला पाकिस्तानसाठी ‘गळ्यातील नस’ संबोधिले होते. तसेच पाकिस्तानचे लोक आपण हिंदूंपेक्षा वेगळे आहोत हे कधीच विसरू शकत नसल्याचे मुनीर यांनी म्हटले होते.
जिन्नांच्या द्विराष्ट्र सिद्धांताची कहाणी मुलांनी ऐकवावी, जेणेकरून फाळणी का झाली हे ते समजू शकतील असे मुनीर यांनी म्हटले होते. मुनीर यांच्या भाषणाच्या 5 दिवसांनी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. पहलगाम येथील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केला होता आणि या दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली होती, असे जयशंकर यांनी मुलाखतीत स्पष्ट केले. पाकिस्तानात दहशतवादी जेथे कुठे लपले असतील, तेथेच त्यांना मारले जाईल. ऑपरेशन सिंदूर जारी आहे, कारण या ऑपरेशनमध्ये एक स्पष्ट संदेश आहे. 22 एप्रिल रोजी ज्याप्रकारची कृत्यं आम्ही पाहिली, तशी पुन्हा घडली तर प्रत्युत्तर दिले जाणार आहे. आम्ही दहशतवाद्यांवर हल्ला करू असे जयशंकर यांनी सांगितले.
अमेरिकेची मध्यस्थी नाही
पाकिस्तानला गोळीबार थांबवायचा असेल तर त्याने भारताच्या जनरलला फोन करून हे कळवावे लागेल असे भारताने सर्व देशांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष होत असताना अमेरिका समवेत अनेक देशांनी समजाविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोळीबार रोखण्याचा निर्णय भारत आणि पाकिस्तानने परस्पर चर्चेनंतर घेतला असल्याचे स्पष्ट करू इच्छितो अशी भूमिका जयशंकर यांनी मांडली. भारत आणि पाकिस्तान दरम्यान एक हॉटलाइन असून त्याद्वारे आम्ही थेट चर्चा करू शकतो. 10 मे रोजी पाकिस्तानच्या सैन्याने गोळीबरा रोखण्यासाठी तयार असल्याचा संदेश पाठविला. यानंतर पाकिस्तान आणि भारताचे सैन्याधिकारी परस्परांशी चर्चा केल्यावर संघर्षविरामावर सहमत झाले असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आपण रोखल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो माझ्याशी बोलले होते, तर उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला होता, अशी माहिती जयशंकर यांनी दिली.
मुलाखतीतील मुख्य अंश
- आसीम मुनीर यांच्या वर्तनातून ते धार्मिकदृष्ट्या किती कट्टर आहेत हे स्पष्ट होते.
- केवळ अमेरिका नव्हे, तर आणखी अनेक देशांनी भारत-पाकिस्तान संघर्ष रोखण्याचे आवाहन केले होते.
- 22 एप्रिलसारखा दहशतवादी हल्ला पुन्हा झाला तर भारत कठोर प्रत्युत्तर देणार ही भूमिका अत्यंत स्पष्ट आहे.
- पाकिस्तानच्या दहशतवादी तळांचा उल्लेख असलेल्या अमेरिकेच्या यादीविषयीही आम्ही सांगितले आहे.
- अमेरिकेच्या यादीत सामील असलेल्या, दहशतवाद्यांचे वास्तव्य असलेल्या अन् कारवाया सुरू असलेल्या ठिकाणांनाच लक्ष्य केले.
- ऑपरेशन सिंदूर जारी आहे, दहशतवादी पाकिस्तानात लपले तरी तेथे घुसून त्यांना मारू.









