न्यूझीलंडवर 102 धावांनी मात : मालिकेत 4-0 ने आघाडी
वृत्तसंस्था/ कराची
येथे झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात यजमान पाकिस्तानने न्यूझीलंडचा 102 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्स्तानने 50 षटकांत 6 बाद 334 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 232 धावांवर आटोपला. पाकिस्तानचा शतकवीर बाबर आझमला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रारंभी, प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा सलामीवीर फखर झामन 14 धावा काढून बाद झाला. यानंतर शान मसूद व कर्णधार बाबर आझम यांनी दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी साकारली. ही जोडी स्थिरावलेली असतानाच मसूदला 44 धावांवर ईश सोधीने बाद केले. यानंतर आलेल्या मोहम्मद रिझवानला (28) मोठी खेळी साकारता आली नाही. कर्णधार आझमने मात्र शानदार शतकी खेळी साकरताना संघाला त्रिशतकी मजल मारुन दिली. त्याने 117 चेंडूत 10 चौकारासह 107 धावा फटकावल्या. आझमला आगा सलमानने चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 117 धावांची भागीदारी साकारली. सलमानने 46 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. ही जोडी बाद झाल्यानंतर मोहम्मद हॅरिस (नाबाद 17) व शाहिन आफ्रिदी (नाबाद 23) धावा करत संघाला 50 षटकांत 6 बाद 334 धावापर्यंत मजल मारुन दिली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
प्रत्युतरादाखल खेळताना उस्मान मीर (43 धावांत 4) व मोहम्मद वासीम (40 धावांत 3 बळी) यांच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 43.4 षटकांत 232 धावांवर आटोपला. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने सर्वाधिक 5 चौकारासह 60 धावा केल्या. तर मार्क चॅपमनने 46 तर मिचेलने 34 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांनी मात्र निराशा केल्यामुळे न्यूझीलंडला या सामन्यात 102 धावांनी हार पत्कारावी लागली.
पाकिस्तान 50 षटकांत 6 बाद 334 (बाबर आझम 107, आगा सलमान 58, शान मसूद 44, मॅट हेन्री 65 धावांत 3 बळी, बेन लिस्टर, ईश सोधी प्रत्येकी एक बळी)
न्यूझीलंड 43.4 षटकांत सर्वबाद 232 (टॉम लॅथम 60, माकॅ चॅपमन 46, मिचेल 34, टॉम ब्लंडेल 23, उस्मान मीर 43 धावांत 4 बळी, वासीम 40 धावांत 3 बळी, हॅरिस रौफ 37 धावांत 2 बळी).









