वृत्तसंस्था/ सिल्हेत
येथे सुरू असलेल्या 2022 च्या महिलांच्या आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात पाक महिला संघाने संयुक्त अरब अमिरातचा 71 धावांनी दणदणीत पराभव केला. पाक संघातील आलिया रियाझला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या स्पर्धेतील हा 17 सामना होता.
रविवारच्या सामन्यात संयुक्त अरब अमिरात महिला संघाने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली. पाकने 20 षटकात 5 बाद 145 धावा जमविल्या. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातने 20 षटकात 5 बाद 74 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 71 धावांनी गमवावा लागला.
पाकच्या डावामध्ये आलिया रियाझने नाबाद अर्धशतक झळकविताना 36 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 57 तर मुनिबा अलीने 45 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारासह 43, निदा दारने 17 चेंडूत 4 चौकारासह नाबाद 25 धावा जमविल्या. कर्णधार मारुफने 7 तर सिद्रा अमिनने 2, आयेशा नसीमने 1 धावा जमविली. पाकच्या डावात 4 षटकार आणि 14 चौकार नोंदविले. संयुक्त अरब अमिराततर्फे इशा ओझाने 22 धावात 3 तर माहिका गौर आणि वैष्णवी महेश यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना संयुक्त अरब अमिरातच्या डावामध्ये खुशी शर्माने 19 चेंडूत 2 चौकारासह नाबाद 20, कविशा इगोडेगीने 43 चेंडूत 18, तीर्था सतीशने 22 चेंडूत 1 चौकारासह 14, ओझाने 3, नताशा चेरियातने 5, कर्णधार मुगलने 2 आणि समिराने नाबाद 2 धावा जमविल्या. संयुक्त अरब अमिरातच्या डावात केवळ 3 चौकार नोंदवले गेले. पाकतर्फे सादिया इक्बाल, अमन अन्वर, एन. संधू आणि ओमिमा सोहेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः पाक 20 षटकात 5 बाद 145 (मुनिबा अली 43, आलिया रियाझ नाबाद 57, निदा दार नाबाद 25, इशा ओझा 3-22, गौर आणि वैष्णवी महेश प्रत्येकी एक बळी), संयुक्त अरब अमिरात 20 षटकात 5 बाद 74 (खुशी शर्मा नाबाद 20, कविशा इगोडेगी 18, टी. सतीश 14, सादिया इक्बाल, अमिन अन्वर, एन. संधू, ओमिमा सोहेल प्रत्येकी एक बळी).









