शेवटच्या सामन्यात 13 धावांनी मात, मोहम्मद नवाज मालिकावीर, साहीबजादा फरहान ‘सामनावीर’
वृत्तसंस्था / लॉडरहिल (अमेरिका)
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाकिस्तानने यजमान विंडीजचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. या मालिकेतील येथे झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात पाकने विंडीजवर 13 धावांनी शानदार विजय मिळविला. या मालिकेतील पहिला सामना पाकने जिंकल्यानंतर पाकने दुसरा सामना विंडीजने जिंकून बरोबरी साधली होती. या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकने 20 षटकात 4 बाद 189 धावा जमवित विंडीजला विजयासाठी 190 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर विंडीजने 20 षटकात 6 बाद 176 धावांपर्यंत मजल मारल्यानंतर त्यांना हा सामना आणि मालिका गमवावी लागली.
पाकच्या डावामध्ये सलामीच्या साहीबजादा फरहानने 53 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह 74 धावा जमविताना सईम आयुब समवेत पहिल्या गड्यासाठी 16.2 षटकात 138 धावांची शतकी भागिदारी केली. आयुबने 49 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 66 धावा झळकविल्या. हसन नवाजने 7 चेंडूत 2 षटकारासह 15, खुशदिल शहाने 1 षटकारासह नाबाद 11 तर फईम अश्रफने 1 षटकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. पाकच्या डावात 11 षटकार आणि 7 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे होल्डर, चेस आणि शमार जोसेन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 47 धावा जमविल्या. पाकचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 75 चेंडूत तर दीड शतक 103 चेंडूत नोंदविले गेले. 10 षटकाअखेर पाकने बिनबाद 82 धावा जमविल्या होत्या. फरहानने आपले अर्धशतक 4 षटकार आणि 2 चौकारांसह 34 चेंडूत तर सईम आयुबने 37 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावामध्ये अॅलिक अथांजे आणि रुदरफोर्ड यांनी अर्धशतके झळकविली. अॅथनेझने 40 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 60 तर रुदरफोर्डने 35 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 51 धावा जमविल्या. अॅन्ड्य्रूने 15 चेंडूत 3 चौकारांसह 24 तर चेसने 12 चेंडूत 2 चौकारासह 15 धावा केल्या. दुखापतीमुळे तो निवृत्त झाला. गुडाकेश मोतीने 4 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 10 धावा जमविल्या. विंडीजच्या डावामध्ये 5 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. विंडीजने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 59 धावा जमविताना 1 गडी गमविला. विंडीजचे अर्धशतक 29 चेंडूत, शतक 69 चेंडूत तर दीडशतक 105 चेंडूत नोंदविले गेले. विंडीजने 10 षटकाअखेर 2 बाद 90 धावा जमविल्या होत्या. पाकतर्फे हसन अली, मोहम्मद नवाज, हॅरीस रौफ, सईम आयुब आणि सुफीयान मुक्कीम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता उभय संघामध्ये 3 सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक : पाक 20 षटकात 4 बाद 189 (साहीबजादा फरहान 74, सईम आयुब 66, हसन नवाज 15, खुशदिल शहा नाबाद 11, फईम अश्रफ नाबाद 10, अवांतर 11, होल्डर, चेस, शमार जोसेफ प्रत्येकी 1 बळी), विंडीज 20 षटकात 6 बाद 176 (अॅथनेझ 60, रुदरफोर्ड 51, अॅन्ड्य्रू 24, चेस 15, मोती नाबाद 10, हसन अली, मोहम्मद नवाज, रौफ, सईम आयुब व सुफीयान मुक्कीम प्रत्येकी 1 बळी).









