अफगाणचा 75 धावांनी पराभव, सामनावीर मोहम्मद नवाजचे हॅट्ट्रीकसह 5 बळी
वृत्तसंस्था / शारजा
येथे झालेल्या तिरंगी टी-20 मालिकेचे अजिंक्यपद पाकिस्तानने पटकाविले. फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर पाकने अंतिम सामन्यात अफगाणचा 75 धावांनी दणदणीत पराभव करुन विजेतेपद मिळविले. या सामन्यामध्ये अफगाण संघाने दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या रचली. मोहम्मद नवाजने मालिकावीर आणि सामनावीर असा दुहेरी मुकुट साधला.
या अंतिम सामन्यात रशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणच्या फिरकी गोलंदाजांनी पाकला 20 षटकात 8 बाद 141 धावांवर रोखले. रशिद खानने 38 धावांत 3 गडी बाद केले. या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांच्या यादीत अफगाणची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. तसेच या स्पर्धेत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकने नोंदविलेली 8 बाद 141 ही दुसऱ्या क्रमांकाची निच्चांकी धावसंख्या आहे. पाकची एकवेळ स्थिती 12 षटकाअखेर 5 बाद 72 अशी केविलवाणी होती. त्यानंतर मोहम्मद नवाजने 21 चेंडूत 25 धावा जमविताना आगा समवेत 40 धावांची भागिदारी केली. आगाने 24 धावा जमविल्या. सईम आयुबने 19 चेंडूत 17 तर फर्क झमानने 26 चेंडूत 27 धावा जमविल्या. रशिद खानने 38 धावांत 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणचा डाव 15.5 षटकात 66 धावांत आटोपला. पाकच्या मोहम्मद नवाजने हॅट्ट्रीकसह 19 धावांत 5 गडी बाद केले. अब्रार अहमद, सुफीयान मुक्कीम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मोहम्मद नवाजने अफगाणची मधली फळी झटपट बाद केली. त्याने आपल्या पहिल्या षटकात अफगाणच्या रसोली आणि ओमर झाई यांना शेवटच्या दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर त्याने इब्राहीम झेद्रानला आपल्या पुढील षटकातील पहिल्या चेंडूवर बाद करुन हॅट्ट्रीक साधली. पाकतर्फे फईम आश्रफ आणि मोहम्मद हेसनेन यांनी 2017 आणि 2019 साली अनुक्रमे श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रीक नोंदविली होती. मोहम्मद नवाजने आपल्या पहिल्या दोन षटकात केवळ 1 धावेच्या मोबदल्यात 4 गडी बाद केले. नवाजने आपल्या शेवटच्या षटकात रशिद खानचा बळी मिळविला. रशिद खानचा अफगाण संघाकडून हा टी-20 प्रकारातील शंभरावा सामना होता. त्याने 17 तर अटलने 13 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक: पाक 20 षटकात 8 बाद 141 (मोहम्मद नवाज 25, आगा 24, फख्र झमान 27, रशिद खान 3-38), अफगाण 15.5 षटकात सर्वबाद 66 (रशिद खान 17, अटल 13, मोहम्मद नवाज 5-19, अब्रार अहमद 2-17, सुफियान मुक्कीम 2-9)









