मायकेल ब्रेसवेल ‘मालिकावीर’, मोहमद नवाज ‘सामनावीर’
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
न्यूझीलंडमध्ये खेळविण्यात आलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत शुक्रवारी पाकिस्तानने यजमान न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात पाच गडय़ांनी पराभव करत अजिंक्यपद पटकावले. ही मालिका जिंकल्याने आता ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकच्या खेळाडूंचा आत्मविश्वास निश्चितच वाढलेला असेल. या तिरंगी मालिकेत न्यूझीलंडचा मायकेल ब्रेसवेल ‘मालिकावीर’ तर पाकच्या मोहम्मद नवाजला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील शुक्रवारच्या अंतिम सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 7 बाद 163 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 19.3 षटकात 5 बाद 168 धावा जमवित हा सामना आणि मालिकेचे जेतेपद केवळ तीन चेंडू बाकी ठेवून जिंकले.
न्यूझीलंडच्या डावामध्ये कर्णधार विल्यम्सनने एकाकी लढत देत नोंदविलेले अर्धशतक वाया गेले. विल्यम्सनने 38 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह 59, फिलिप्सने 22 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह 29, चॅपमनने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 25, नीशमने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, ऍलेनने 6 चेंडूत 3 चौकारासह 12 आणि कॉनवेने 17 चेंडूत 2 चौकारासह 14 धावा जमविल्या. फिलिप्स आणि विल्यम्सन या जोडीने तिसऱया गडय़ासाठी 50 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे नसीम शाह आणि हॅरीस रौफ यांनी प्रत्येकी 2 तर शदाब खान आणि मोहम्मद नवाज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये सलामीच्या मोहम्मद रिजवानने 29 चेंडूत 4 चौकारासह 34, कर्णधार बाबर आझमने 14 चेंडूत 3 चौकारासह 15, शान मसूदने 21 चेंडूत 2 चौकारासह 19, मोहमद नवाजने 22 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 38, हैदर अलीने 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 31, इफ्तिकार अहमदने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 25 धावा झळकविल्या. इफ्तिकार अहमद आणि मोहम्मद नवाज या जोडीने विजयाचे सोपस्कार पूर्ण करताना सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 36 धावांची भर घातली. तत्पूर्वी रिझवान आणि आझम यांनी सलामीच्या गडय़ासाठी 29 धावांची तर त्यानंतर हैदर अली आणि मोहम्मद नवाज यांनी चौथ्या गडय़ासाठी 56 धावांची भागीदारी केली. पाकच्या डावामध्ये 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे ब्रेसवेलने 2 तर साऊदी, टिकनर आणि सोधी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
मोहम्मद नवाजच्या समयोचित फलंदाजीमुळे पाकला या तिरंगी मालिकेचे विजेतेपद मिळविता आले. पाकला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी 11 धावा तर शेवटच्या षटकात केवळ 4 धावा विजयासाठी जरुरीच्या होत्या. इफ्तिकार अहमदने उत्तुंग षटकार नोंदवून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक ः न्यूझीलंड 20 षटकात 7 बाद 163 (विल्यम्सन 59, फिलिप्स 29, चॅपमन 25, नीशम 17, कॉनवे 14, ऍलेन 12, नसीम शाह 2-38, हॅरीस रौफ 2-22, शदाब खान 1-30, मोहम्मद नवाज 1-33), पाक 19.3 षटकात 5 बाद 168 (मोहम्मद रिझवान 34, बाबर आझम 15, शान मसूद 19, मोहम्मद नवाज नाबाद 38, हैदर अली 31, असीफ अली 1, इफ्तिकार अहमद नाबाद 25, ब्रेसवेल 2-14, साऊदी 1-33, टिकनर 1-33, सोधी 1-58).









