इराण सेनाधिकाऱ्याच्या वादग्रस्त विधानामुळे तणाव
वृत्तसंस्था / तेहरान
इस्रायलने इराणवर अणुबाँब हल्ला केल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुबाँब टाकेल, असे वादग्रस्त विधान इराणच्या क्रांतीकारी सेनेचे प्रमुख आणि त्या देशाच्या सुरक्षा मंडळाचे सदस्य मोहसीन रेझाई यांनी केले आहे. मात्र, पाकिस्तानने या विधानाचा इन्कार केला आहे. मात्र, या विधानामुळे जगात खळबळ उडाली आहे.
सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात सशस्त्र संघर्ष भडकला आहे. सलग चार दिवस दोन्ही देशांनी एकमेकांवर वायुहल्ले चढविले आहेत. इस्रायलने इराणची अणुसंशोधन केंद्रे, सेना आस्थापने आणि अणुप्रक्रिया भट्ट्यांना आपल्या विमान हल्ल्याचे लक्ष्य बनविले होते तर इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा मारा चालविला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला मोठा धक्का बसल्याची माहिती उपलब्ध झाली असून इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलचे आठ नागरीक मृत्यूमुखी पडले आहेत. मात्र, इस्रायलच्या सेना आस्थापनांची विशेष हानी झालेली नाही. इराणने अमेरिकेच्या तेल अवीव येथील तळावरही क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, या तळाची किरकोळ हानी झाल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर हे वादग्रस्त विधान चिंतेचा विषय ठरले आहे.
पाकिस्तान बांधील नाही
इस्रायलने इराणवर अणु हल्ला केल्यास पाकिस्तान इस्रायलवर अणुहल्ला करण्यास बांधील नाही. आम्ही तसा शब्द इस्रायलला दिलेला नाही, अशी सारवासारवी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी केली. इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षात पाकिस्तान मधे पडणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
पाकिस्तानचा इराणला पाठिंबा
इस्रालयने पाच दिवसांपूर्वी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानने इराणला पाठिंबा घोषित केला होता. आम्ही दोन्ही मुस्लीम राष्ट्रे आहोत. त्यामुळे आमची एकात्मता आम्ही दर्शविली पाहिजे. त्यामुळे आम्ही याप्रसंगी इराणला समर्थन घोषित करत आहोत, असे पाकिस्तानने या हल्ल्यानंतर स्पष्ट केले होते. मात्र, अणुहल्ल्याचा विषय निघाल्यानंतर मात्र, पाकिस्तानने हात झटकले आहेत.
इराणचा अणुकार्यक्रम पाच वर्षे मागे
इस्रालयने इराणच्या अणुकेंद्रांवर अचूक हल्ले चढविल्याने अण्वस्त्र निर्माण करण्याचा इराणचा कार्यक्रम किमात पाच वर्षे मागे पडला आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किमान 14 अणुशास्त्रज्ञ ठार झाल्याने आता अणुकार्यक्रम पुढे नेण्यासाठी त्या देशाकडे अनुभवी नेतृत्वाची कमतरता निर्माण झाली आहे. अणुबाँब तयार करण्यासाठी संपृक्त युरेनियमची आवश्यकता असते. इराणला अद्याप अशा प्रकारचे युरेनियम तयार करण्यात म्हणावे तसे यश मिळालेले नाही, असा एक मतप्रवाह आहे. मात्र, काही तज्ञांच्या मते इराण अणुबाँब निर्मितीच्या अगदी जवळ पोहचलेला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच तो अण्वस्त्र निर्माण करण्याच्या स्थितीत येऊ शकतो. त्या देशाला अण्वस्त्र निर्माण करण्यात यश आल्यास इस्रायलसमोर अस्तित्वाचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यामुळे इस्रायल इराणचा अणुकार्यकम शक्य तितका मागे ढकलण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे तज्ञांचे मत आहे.
इस्रायल-इराण संघर्ष चिघळला
सलग चार दिवस इस्रालय आणि इराण यांच्यात संघर्ष होत आहे. यामध्ये आतापर्यंत इराणची हानी प्रचंड प्रमाणात झाली असली, तरी इराणची काही क्षेपणास्त्र इस्रायलच्या नागरी वस्त्यांवर पडली आहे. त्यामुळे काही नागरीकांना प्राण गमवावे लागले. तथापि, इराणची 95 टक्के क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे. इराणचा अणुकार्यक्रम हाणून पाडण्याचे इस्रायलचे ध्येय असून ते साध्य करण्यासाठी इस्रायलने सातत्याने इराणची अणुकेंद्रे तसेच त्याचे तेलसाठे आणि नैसर्गिक वायूसाठ्यांवर वायुहल्ले चालविले आहेत.









