बालाकोट एअर स्ट्राईकनंतरची घटना ः अमेरिकेच्या माजी विदेशमंत्र्यांचा दावा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी विदेशमंत्री माईक पॉम्पियो यांनी लिहिलेल्या पुस्तकामुळे पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा समोर आल्या आहेत. तसेच भारताच्या माजी विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी दाखविलेली चाणाक्ष वृत्ती एक मोठय़ा संकटाला रोखण्यास उपयुक्त ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोटमध्ये भारतीय वायुदलाने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तान भारतावर आण्विक हल्ल्याची तयारी करत होता. परंतु स्वराज यांनी वेळीच पुढाकार घेतल्याने अनर्थ टळला, असा दावा अमेरिकेचे माजी विदेशमंत्री माइक पॉम्पियो यांनी केला आहे. प्
27-28 फेब्रुवारी 2019 रोजी अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेदरम्यान भारताच्या तत्कालीन विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनंतर रात्रभर जागून अनेक पावले उचलावी लागली. मोठे संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर भारत आणि पाकिस्तानातील उच्चपदस्थांशी चर्चा करत होतो. तेव्हा भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले होते हे जगाला कळले पाहिजे असे पॉम्पियो यांनी स्वतःच्या पुस्तकात लिहिले आहे.
आण्विक हल्ल्याची होती शक्यता
पॉम्पियो यांनी स्वतःचे पुस्तक ‘नेव्हर गिव्ह ऍन इंच ः फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ सादर केले आहे. फेब्रुवारी 2019 मध्म्ये भारत-पाकिस्तान संघर्ष आण्विक हल्ल्याच्या किती नजीक पोहोचला होता याची कल्पना जगाला नसावी असे माझे मत आहे. प्रत्यक्षात याचे योग्य उत्तर मलाही माहित नाही, परंतु दोन्ही देश आण्विक हल्ल्याच्या नजीक पोहोचले होते एवढेच मी जाणतो असे पॉम्पियो यांनी नमूद केले आहे.
व्हिएतनाममध्ये झाली चर्चा
भारतीय वायुदलाने 26 फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक केला होता, 27-28 फेब्रुवारी रोजी अमेरिका-उत्तर कोरिया शिखर परिषदेसाठी मी व्हिएतनामच्या हनोईमध्ये होतो. एअर स्ट्राइकवरून माझ्या टीमने भारत आणि पाकिस्तानशी चर्चा केली होती. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाल्यावर भारताच्या लढाऊ विमानांनी बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळाला नष्ट पेले होते असे पॉम्पियो म्हणाले.
ती रात्र कधीच विसरणार नाही
ती रात्री मी कधीच विसरणार नाही, मी हनोईत होतो. एकीकडे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रांवर चर्चा होत होती. दुसरीकडे भारत आणि पाकिस्ताने परस्परांवर आण्विक हल्ले करण्याची तयारी चालविली होती. तत्कालीन भारतीय विदेशमंत्र्यांनी पाकिस्तान आण्विक हल्ल्याची तयारी करत असल्याचे आणि भारतही प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले होते. यावर मी त्यांना काहीही न करण्याची आणि सर्वकाही सुरळीत होण्यासाठी थोडा वेळ देण्याची सूचना केली होती. यानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला मग पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी चर्चा केली, बाजवा यांना प्रारंभी अणुयुद्धाची शक्यता फेटाळली होती. बाजवा यांची समजूत काढली आणि मग पाकिस्तान अणुयुद्धाची तयारी करत नसल्याचे भारताला कळविले, असे पॉम्पियो यांनी पुस्तकात लिहिले आहे.









