देशविरोधी लोकांच्या मालमत्ता जप्त
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
फुटिरवादी नेते आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात एनआयएने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये फुटिरवादी नेते आणि दहशतवाद्यांच्या मालमत्ता जप्त केल्याने नक्राश्रू ढाळले आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय अन् लष्कर-ए-तोयबा यासारख्या दहशतवादी संघटना याच फुटिरवाद्यांच्या माध्यमातून दहशतवाद्यांपर्यंत पैसे पोहोचवित होत्या. तसेच दहशतवाद्यांना आश्रय पुरविण्याचे काम फुटिरवाद्यांकडून पेले जात होते. परंतु एनआयएने अशा देशविरोधी लोकांची ओळख पटवत त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे सत्र आरंभिले आहे.
भारताची राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि स्थानिक तपास यंत्रणा अत्यंत आक्रमकपणे काश्मिरी (फुटिरवादी)ची मालमत्ता जप्त करत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी केला आहे. स्थानिक तपास यंत्रणेने 2021 पासून अशा 124 मालमत्ता जप्त केल्याने ही चिंतेची बाब आहे. भारताच्या या कारवाईची आम्ही निंदा करतो. भारताने ऑल पार्टीज हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रवक्ते अयाज अकबरची श्रीनगरमधील मालमत्ता जप्त केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अयाज अकबरवर फुटिरवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप असून तो 2017 पासून तुरुंगात कैद आहे. एनआयएने अकबरच्या दोन मालमत्ता जप्त केल्या आहेत. एनआयएच्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी काश्मिरी उद्योजक जहूर अहमद शाह यांच्या 17 मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या.
दहशतवाद्यांना वित्तपुरवठा केल्याप्रकरणी अकबर सध्या तिहार तुरुंगात कैद आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी अकबर हा पैसे पुरवत होता. एनआयएने फुटिरवाद्यांवर जोरदार कारवाई केल्याने पाकिस्तान आता बिथरला आहे. याचमुळे तो भारतावर आरोप करत कारवाई रोखण्याचे आवाहन करत आहे.









